| लोकजागर | फलटण | दि. १४ एप्रिल २०२५ |
महानुभाव पंथाची दक्षिण काशी व ऐतिहासिक दृष्टीने महत्व प्राप्त झालेल्या .श्रीक्षेत्र फलटण येथील घोडा यात्रा म्हणजेच श्री चक्रपाणी प्रभू पालखी महोत्सव काल दिनांक १३ एप्रिल २०२५ पासून सुरु झाला आहे. यात्रेचा मुख्य दिवस हा शुक्रवार १८ एप्रिल २०२५ रोजी आहे.

दररोज संध्याकाळी महाआरती नंतर ठीक सायंकाळी ७ वा श्रीकृष्ण मंदिरातून छबिना वाद्यांचा गजरात निघून रात्री १० पर्यंत श्रीमंत आबासाहेब मंदिरात पोहचतो व तेथील महाआरती संपन्न होते. यात्रेच्या मुख्य दिवशी दि. १८ एप्रिल रोजी दुपारी ठीक १ वाजता श्रीमंत आबासाहेब मंदिर येथून स्थान पूजन व पालखी पूजन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होऊन छबीना नगर प्रदक्षिणेला निघणार आहे. छबिना श्रीमंत आबासाहेब मंदिर येथून तेली गल्ली मार्गे, श्रीकृष्ण मंदिर, व तेथून शुक्रवार पेठ मार्गे रंगारी महादेव मंदिरापासून, अवस्थान मंदिर, व पुढे बाणगंगा नदी येथून शुक्रवार पेठ मार्गे, पुन्हा श्रीकृष्ण मंदिर व रात्री ७ वाजता पुन्हा श्रीमंत आबासाहेब मंदिर येथे पोहोचेल. या ठिकाणी महाआरती होईल.
यात्रेनिमित्त विविध ठिकाणाहून विशेष करून हरियाणा, पंजाब ,मध्य प्रदेश, दिल्ली ,गुजरात ,उत्तर प्रदेश, कर्नाटक ,तेलंगणा, या राज्यातून भाविक भक्त फलटणमध्ये दाखल होत असतात व स्थानिक हजारो भक्त येत असतात. हे सर्व भाविक भक्त फलटण येथील सर्व मंदिर व परिसरातील आश्रमांमध्ये राहात असतात. यात्रेनिमित्त सर्व मंदिरांची स्वच्छता व रंगरंगोटी पूर्ण करण्यात आली असून. नगरपालिका सुद्धा यात्रेदरम्यान सर्व सोयी सुविधा उपलब्ध करत असते. तसेच प्रशासन ही सर्व खबरदारी घेत असते. यावर्षी १४ एप्रिल रोजी महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती असल्याने त्या दिवशीचा छबिना रात्री साडेसात वाजता सुरू होऊन नऊ वाजेपर्यंत श्रीमंत आबासाहेब मंदिरामध्ये आणण्याचे पोलीस प्रशासन व श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टी मंडळी व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती यांच्यामध्ये ठरले आहे. तसेच या दिवशी मारवाड पेठ व आबासाहेब मंदिर या रस्त्यावरती कोणीही आपल्या गाड्या पार्किंग करू नयेत. भाविक भक्तांनी आपल्या गाड्या श्रीमंत आबासाहेब मंदिरा पाठीमागील रंगशिळा मंदिर या परिसरामध्ये लावाव्यात असे आवाहन पोलीस प्रशासन व श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात येत आहे, असे विश्वस्त श्री बाळासाहेब ननावरे यांनी कळविले आहे.
महानुभाव पंथीयांची दक्षिणकाशी म्हणून संपूर्ण भारतात ओळख असणाऱ्या फलटणची घोड्याची यात्रा पहाण्यासाठी यात्रेच्या मुख्य दिवशी हजारो भाविक येत असतात. या सर्वांना रस्त्यामध्ये विविध मंडळांचे कार्यकर्ते लिंबू सरबत व पाण्याची सोय करत असतात. तसेच यात्रेसाठी येणारी सर्व दुकाने प्रसाद व इतर साहित्यांची दुकाने श्रीकृष्ण मंदिर व अवस्थान मंदिर या शेजारी असणाऱ्या ग्राउंड वरती दुकानदार लावत असतात. यात्रेनिमित्त सर्व मंदिरांमध्ये दररोज वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात येत आहे.
