श्रीराम एज्युकेशन सोसायटीचा 66 वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा
। लोकजागर । फलटण । दि. 10 जून 2025 ।
आधुनिक काळानुरुप विद्यार्थ्यांना आवश्यक बाबी देण्यासाठी श्रीराम एज्युकेशन सोसायटी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन, संस्थेचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी – बेडके यांनी केले.

येथील ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार’ प्राप्त श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचा 66 वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला. त्याप्रसंगी डॉ. सचिन सूर्यवंशी – बेडके बोलत होते. यावेळी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्र फलटणचे अधिव्याख्याता व तालुका संपर्कप्रमुख डॉ. सतीश फरांदे, अधिव्याख्याता कृष्णा फडतरे, गट समन्वयक सौ. दमयंती कुंभार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
‘‘ श्रीराम एज्युकेशन सोसायटीची स्थापना 10 मे, 1959 साली झाली. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. कर्मयोगी कै. नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) व कै. सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांच्या आशीर्वादाने आज श्रीराम एज्युकेशन सोसायटीमधून हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन समाजात विविध क्षेत्रांमध्ये उच्च पदावरती विराजमान झालेले आहेत. आधुनिक काळाप्रमाणे विद्यार्थ्यांना आवश्यक असणार्या सर्व बाबी देण्यासाठी संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र सूर्यवंशी (बेडके) तसेच सर्व संचालक मंडळ प्रयत्न करत आहोत. संस्थेच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांच्या नावाने करण्यात आलेल्या वृक्षारोपणाचा उपक्रम कौतुकास्पद आहे’’, असेही डॉ. सचिन सूर्यवंशी – बेडके यांनी यावेळी सांगितले.

प्रारंभी उपस्थित मान्यवर व संस्थेच्या चारही शाखांचे प्राचार्य, उपप्राचार्य पर्यवेक्षक यांच्या हस्ते श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
त्यानंतर इयत्ता दहावी व इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांच्या नावाने, त्यांच्या हस्ते पालकांसमवेत व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये कु. आर. एस. सस्ते यांनी कार्यक्रम घेण्यामागचा हेतू व उद्देश सांगून संस्थेच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा स्पष्ट केली.

तद्नंतर शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण व सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मधील इयत्ता दहावी व बारावी मध्ये प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच एनएमएमएस, स्कॉलरशिप, संस्कृत स्कॉलरशिप, दत्तक पालक योजना, इलेमेंटरी परीक्षा यामध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसमवेत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त प्रशालेमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व स्कॉलरशिप परीक्षेविषयी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ज्ञानसंवर्धनी हायस्कूल, शिरवळचे महम्मद रफीक पठाण यांनी शिक्षकांना सखोल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाकरिता चारही शाखांचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यामागे प्रशालेचे प्रभारी प्राचार्य पी. डी. घनवट व सर्व विभाग प्रमुखांनी व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एस. एम. तगारे यांनी केले तर आभार सौ. एस. सी. अडसूळ यांनी मानले.