। लोकजागर । फलटण । दि. 16 जून 2025 ।
श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मध्ये प्रवेशोत्सव कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष 2025 -26 ची सुरुवात नवागतांचे व त्यांच्यासोबत आलेल्या पालकांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करत करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात सौ. एस. एम. तगारे व जी. बी. वाघ यांनी स्वागत गीत गायन करून केली. प्रशालेत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे प्रभारी प्राचार्य पी. डी. घनवट यांचे हस्ते लेखणी देऊन व पालकांना वृक्ष व पुष्पगुच्छ देऊन प्रशालेच्या वतीने स्वागत करण्यात आले. इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ग्रंथालय प्रमुख अमरसिंह सूर्यवंशी (बेडके) यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत पाठ्यपुस्तक प्रशालेच्या वतीने वाटप करण्यात आली.

प्रशालेमध्ये राबवण्यात येणाऱ्या गुरुजी AIR आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मोफत पाठ्यपुस्तक, मोफत गणवेश वाटप, मोफत सायकल वाटप, मोफत एस. टी. पास योजना, विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, MHT-CET मार्गदर्शन केंद्र, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, विद्यार्थी- पालक समुपदेशन केंद्र या विविध उपक्रमांची माहिती प्रा. एस. डी. यादव यांनी दिली.

कर्मयोगी कै. नामदेवराव बळवंतराव सूर्यवंशी (बेडके) व कै. सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) यांनी आपले पूर्ण जीवन शिक्षण कार्यासाठी वाहून घेतले. आधुनिक काळाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय सुलभरीत्या निर्माण होण्यासाठी कै. सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) यांनी अथक परिश्रम करून विविध कोर्सेस या संस्थेत सुरू केले आहेत. संस्थेचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) व नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र सूर्यवंशी (बेडके) यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची शैक्षणिक वाटचाल सुरू आहे, असे उपस्थित पालकांना मार्गदर्शन करताना यावेळी सांगण्यात आले.

याप्रसंगी नवागत विद्यार्थी व पालकांना प्रशालेतील विविध उपक्रमांची व विभागांची ओळख व माहिती शिक्षकांनी करून दिली. प्रशालेच्या वतीने प्रशालेतील सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्यासाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते त्याचा आस्वाद उपस्थितांनी घेतला. या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्तम नियोजन प्रशालेचे प्रभारी प्राचार्य प्रा. पी. डी.घनवट व सर्व विभाग प्रमुख यांनी केले. सूत्रसंचालन सौ. एस. एम. तगारे यांनी केले तर आभार प्रा. सौ. एस. सी. अडसूळ यांनी मानले.