माऊलींचे आगमन अवघ्या दहा दिवसांवर तरीही पालखी मार्गावर खड्डे, चिखल आणि राडा

फलटणमध्ये सरकारी दुर्लक्षातून धार्मिक श्रद्धेची खिल्ली

। लोकजागर । फलटण । दि. 19 जून 2025 ।

साधू, संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा !! याप्रमाणे प्रतिवर्षी संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याच्या फलटण शहरातील आगमनाच्या निमित्ताने शहरवासियांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळतो. सरकारी यंत्रणेपासून वैयक्तीक पातळीवर प्रत्येक जण वारकर्‍यांच्या सेवेत मग्न असतो. यंदा मात्र माऊलींचे आगमन अवघ्या दहा दिवसांवर येवून ठेपलेले असताना फलटण शहरातील अंतर्गत पालखी मार्गाची कामे रखडल्याने या मार्गावर खड्डे, चिखल आणि राडा पहायला मिळत आहे. त्यामुळे सरकारी दुर्लक्षातून धार्मिक श्रद्धेची खिल्ली उडण्याचा प्रकार घडत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होताना दिसत आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे आज दिनांक 19 रोजी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. हा सोहळा दिनांक 28 रोजी फलटण शहरात मुक्कामी येणार आहे. शहरातील जिंती नाका, मलठण, पाचबत्ती चौक, गजानन चौक, महात्मा फुले चौक, गिरवी नाका या मार्गे हा सोहळा विमानतळावर मुक्कामासाठी जात असतो. यंदाच्या वर्षी रस्त्यांच्या प्रलंबित कामांमुळे वारीची ही वाट बिकट अवस्थेत असून येत्या दहा दिवसात या ठिकाणची अर्धवट कामे पूर्ण होतील याबाबत मोठे प्रश्‍नचिन्ह आहे.

मलठण, कामगार वसाहत, गिरवी नाका, रिंग रोड परिसरात सुरु करण्यात आलेले सिमेंट रोडचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. शिवाय पाचबत्ती चौक, गजानन चौक, महात्मा फुले चौक, नाना पाटील चौक या ठिकाणच्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरावस्था झालेली आहे. शहरातील अन्य अंतर्गत रस्त्यांचीही अक्षरश: चाळण झाली आहे. अशा परिस्थितीत पालखी सोहळ्यादरम्यान वारकर्‍यांना फलटण शहरात ‘न भूतो न भविष्यती’ अशा त्रासाला सामोरे जावे लागणार की काय? अशी शक्यता नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, आळंदी देवस्थान कमिटीचे प्रमुख विश्‍वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागरजन यांनी पालखी तळ पाहणी दौर्‍याप्रसंगी रस्त्याच्या कामांबाबत सूचना दिल्या आहेत. आमदार सचिन पाटील यांनी पालखी मार्गावरील अडथळ्यांवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश देऊन फलटणमध्ये आढावा बैठक घेतली होती. त्यांनी प्रशासनाला अडथळे तात्काळ दूर करण्यास सांगितले आहे. मात्र अद्याप रस्त्याची सर्व कामे अपूर्ण अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने याबाबत गांभीर्याने तातडीच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

सचिन ढोलेंची उणीव यंदाची वारी अनुभवणार

मागील वर्षी फलटणचे प्रांताधिकारी म्हणून सचिन ढोले हे कार्यरत होते. सचिन ढोले हे एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. यासोबतच ते स्वतः विठ्ठल भक्त असल्याने त्यांनी पालखी काळामध्ये वारीचे नेटके नियोजन केल्याचे बघायला मिळाले होते. सध्या ते नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे सह आयुक्त म्हणून प्रशासकीय सेवेत आहेत. यंदाच्या वर्षी सचिन ढोले यांच्यासारख्या अधिकार्‍याची उणीव मात्र पालखी सोहळ्यात अनुभवली जात आहे.

Spread the love