। लोकजागर । फलटण । दि. 27 जून 2025 ।
“जिल्हा परिषदेच्या शाळेत गुणवत्ता, स्पर्धात्मक परीक्षा, खेळ हे जीवन विकासासाठी आवश्यक आहेत . मातृभाषा शिक्षण काळाची गरज आहे. रेसच्या घोड्या सारखे विद्यार्थ्यांना पालकांनी न पळवता हसत खेळत शिक्षण देणं काळाची गरज आहे . यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेला पर्याय नाही “. असे मत ग्रामीण कथाकार, प्रबोधनकार, प्रसिद्ध वक्ते प्रा रवींद्र कोकरे यांनी मांडले.

संत सद्गुरू बाळूमामा मासिक अमावस्या भंडारानिमित्त खडकी (ता. फलटण) येथे आयोजित व्याख्यानात कोकरे यांनी विचार मांडले. गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात मार्गदर्शन करताना शिक्षक, पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ, भाविक भक्त बहुसंख्येने उपस्थित होते.

” NMS, ITS, प्रज्ञाशोध, विविध खेळ, शिष्यवृत्ती यात ग्रामीण मुला मुलींच्यात नैपुण्य दिसून येत आहे. पालकांनी आपल्या पाल्यांच्या आवडी निवडीनुसार त्यांना वाव द्यावा. विनाश काले विपरीत बुद्धी न वापरता सारासार विचार पालकांनी करावा. कोणत्याही क्षेत्रातील करिअरमध्ये यशस्वी होता येते”. असे मौलिक विचार कोकरे यांनी यावेळी मांडले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शालेय साहित्य वाटप करून करण्यात आला.
