ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषांनी ऐतिहासिक फलटण नगरी दुमदुमली

। लोकजागर । फलटण । दि. 28 जून 2025 ।

सुखा लागी जरी करीशी तळमळ।
तरी तू पंढरीसी जाय एक वेळ।।
मग तू अवघाची सुखरूप होशी।
जन्मोजन्मीचे सुख विसरशी।।
या अभंगातील ओव्याप्रमाणे आपल्या लाडक्या विठूरायाच्या भेटीची आस मनात धरून आषाढी वारीसाठी निघालेला लाखो वैष्णवांचा मेळा,त्यांनी केलेला टाळ मृदुंगाचा गजर आणि ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषांनी ऐतिहासिक फलटण नगरी दुमदुमून गेली.

सायंकाळी सहा वाजता माऊलींचा पालखी सोहळा फलटण मुक्कामासाठी विसावला. दरम्यान मार्गावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून माऊलींचे उत्साहात स्वागत केले.भाविकांनी पालखीच्या दर्नासाठी गर्दी केली होती. उद्या (रविवारी) हा पालखी सोहळा जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामासाठी बरड येथे प्रस्थान ठेवणार आहे.

तरडगाव येथील मुक्काम आटोपून फलटणच्या दिशेने प्रस्थान ठेवल्यानंतर श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सायंकाळी सहा वाजता फलटणचे प्रवेशव्दार असलेल्या जिंती नाका येथे पोचल्यानंतर मुख्याधिकारी निखिल मोरे, प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर,तहसीलदार डॉ.अभिजित जाधव यांनी सोहळ्याचे उत्साहात सोहळयाचे स्वागत केले.

शहरामध्ये पालखीच्या स्वागतासाठी आकर्षक रांगोळया काढण्यात आल्या होत्या. सोहळा मलठण,उंबरेश्वर चौक,संत हरिबुवा मंदीर मार्गे पाचबत्ती चौक,कसबा पेठेत पोचला.आश्वापाठोपाठ सायंकाळी 6 वाजता पालखीचे आगमन झाले.दरम्यान मार्गावर भाविकांनी दुतर्फा रांग लावून फुलांची उधळण करून माऊली..माऊलीच्या जयघोषात माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतले.
पालखी सोहळा ऐतिहासिक श्रीराम मंदिराजळ आल्यानंतर नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर,जि.प.च्या माजी सदस्या शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांनी स्वागत केले.याठिकाणी दर्शन घेण्यासाठी भाविकांनी केले होती. त्यानंतर सोहळा गजानन चौक, महात्मा फुले चौक,गिरवी नाका मार्गे फलटण येथील विमानतळावर मुक्कामासाठी विसावला.

पालखी तळावर माऊली..माऊलीच्या जयघोषात पालखी रथातून उतरवून समाज आरतीसाठी तळावर आणण्यात आली.यानंतर माऊलीच्या चोपदारानी हातातील चोप वर केल्यावर पालखी तळावर सर्वत्र शांतता पसरली. यावेळी माऊलीच्या वंशपरापरागत चोपदरांनी हरवलेल्या वस्तू व सापडलेल्या वस्तू वाचून दाखवल्या.हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये माऊलीची समाज आरती झाली.माऊलीच्या समाज आरतीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

समाज आरती झाल्यानंतर माऊलींच्या पादुकाचे दर्शन घेण्यासाठी फलटणकरांनी मोठी गर्दी केली होती.’साधुसंत येती घरा, तोच दिवाळी दसरा’ या उक्तीप्रमाणे शहरात सर्वत्र माऊलीमय वातावरण झाले होते.दर्शन रांगेचे योग्य नियोजन केल्यामुळे गर्दी असूनही भाविकांनी शिस्तीचे पालन करून माऊलीच्या पादुकांचे दर्शन घेतले.रात्री उशिरापर्यंत वारकरी भाविक दंग झाले होते.

प्रशासनाकडून पालखी तळावरील मुख्य रस्त्यावर डांबरीकरण आणि तळ परिसरात कच टाकून केलेले रोलिंग,पुरूष व स्त्रियांसाठी स्वतंत्र शौचालय व स्नानगृहाची सोय, चोहोबाजूंनी हायमास्ट आणि दर्शन बारीचे केलेले योग्य नियोजन यामुळे वारकऱ्यांना यंदा चांगल्या सुविधा मिळाल्या. सोहळा प्रमुखांनी प्रशासनाचे कौतुक केले. दरम्यान सोहळा प्रमुख डॉ.भावार्थ देखणे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, राजाभाऊ चोपदार,बाळासाहेब चोपदार यांचा नगर परिषदेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.

Spread the love