। लोकजागर । फलटण । दि. 01 जुलै 2025 ।
समता घरेलू कामगार संघटनेच्यावतीने केंद्रीय घरेलु कामगार कायदा झालाच पाहिजे या देशव्यापी मागणीसाठी उद्या बुधवार, दिनांक 2 जुलै 2025 रोजी फलटण येथे ‘आपला खासदार प्रतिबद्ध खासदार अभियाना’चे आयोजन करण्यात आले आहे.

येथील अनंत मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता आयोजित या कार्यक्रमास माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, फलटणचे माजी आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ललीत बाबर, पुणे येथील मासुम संस्थेचे संयोजक जया नलगे, मुंबई येथील युवा संस्थेचे कार्यक्रम समन्वयक तस्लिम खान, विजय खरात, राष्ट्र सेवा दलाचे बाबा नदाफ, समता घरेलू कामगार संघटनेच्या अध्यक्षा कल्पना मोहिते – लोंढे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

केंद्रीय घरेलु कामगार कायदा राज्यसभेत व लोकसभेत मंजूर व्हावा यासाठी खासदारांनी प्रयत्न करावेत, या उद्देशाने ‘आपला खासदार प्रतिबद्ध खासदार अभियान’ महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती यांच्या माध्यमातून राबवले जात आहे. तरी या कार्यक्रमास घरेलू कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन समता घरेलू कामगार संघटनेच्या अध्यक्षा कल्पना मोहिते – लोंढे यांनी केले आहे.
