फलटण तालुक्यात ‘वारी साक्षरतेची’ उत्साहात संपन्न

। लोकजागर । फलटण । दि. 01 जुलै 2025 ।

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत शिक्षण संचालनालय योजना, पुणे आणि जिल्हा परिषद सातारा व पंचायत समिती फलटण शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वारी साक्षरतेची’ या विशेष उपक्रमांतर्गत फलटण तालुक्यातील जिंती नाका येथे साक्षरतेच्या दिंडीचे भव्य स्वागत करण्यात आले.

या उपक्रमात दिवसभरात तरडगाव, फलटण व बरड पालखी मार्गा दरम्यान असाक्षर व्यक्तींची नोंदणी लिंकद्वारे किंवा ऑफलाइन फॉर्मद्वारे फलटण शहरातील व ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा आणि विविध शिक्षण संस्थांच्या मदतीने पालखी सोहळ्यातील दिंडीमधील वारकरी लोकांमधून असाक्षर व्यक्तींची माहिती संकलित करून ती ऑनलाइन पद्धतीने किवा ऑफलाइन पद्धतीने अपलोड करण्यात आली. तसेच यावेळी शिक्षकांच्या मदतीने घडीपत्रीका वाटप करण्यात आले तसेच यावेळी साक्षरतेवरती घोषवाक्य, साक्षरतेची गाणी, गवळणी यांच्या माध्यमातून जनजागृती व प्रचार-प्रसार करण्यात आला. श्री. साबळे यांच्या साक्षरतेविषयक गीतांनी वारकर्‍यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले व वारकर्‍यांनी त्यांच्या गाण्यावरती ठेका धरला आणि अश्या प्रकारे साक्षरतेचा संदेश सहज आणि प्रभावीपणे पोहोचवण्याचे मोठे कार्य या दिंडीद्वारे घडून आले.

‘वारी साक्षरतेची’ या विशेष उपक्रमांतर्गत सातारा जिल्हा परिषद योजना शिक्षण विभाग व शिक्षणाधिकारी श्रीमती मुजावर यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या कार्यक्रमास शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love