। लोकजागर । फलटण । दि. 02 जुलै 2025 ।
फलटण नगरपरिषदेमार्फत सद्यस्थितीत मा. केंद्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० ची अंमलबजावणी गतिमान पध्दतीने करणेकरिता प्रसार माध्यमांद्वारे प्रसिद्धी, शहरातील विविध ठिकाणी मेळावे व सभा घेऊन इच्छुक लाभार्थ्यांना माहिती देण्याचे काम सुरु आहे. तरी जास्तीत जास्त इच्छुक लाभार्थींनी घरकुल योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन फलटण नगर पालिकेकडून करण्यात आले आहे.
याबाबत पालिकेकडून देण्यात आलेली माहिती अशी की, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० या योजनेअंतर्गत प्राप्त अर्जांचे सर्व्हेक्षण करून त्यापैकी पात्र अर्जांच्या छाननी अंती फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे, तत्कालीन नगर अभियंता मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली PMAY कक्षातील अभियंता श्रीमती सिमरन पठाण ( शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ स्थापत्य अभियंता CLTC) आणि अमोल कदम (व्यवस्थापन प्रणाली तज्ञ संगणक अभियंता MIS) यांच्यामार्फत वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम (BLC) या घटकांतर्गत ५१ घरकुलांचा सविस्तर प्रकल्प अहवाल Unified Web Portal वरती मंजुरी करिता सादर करण्यात आला होता. मा. केंद्रशासनाने दि. ३०/०६/२०२५ रोजीच्या केंद्रीय मंजुरी आणि सनियंत्रण समिती बैठकीमध्ये (CSMC) सदर ५१ घरकुलांना मंजुरी देऊन प्रति लाभार्थी २,५०,०००/- रु. इतके अनुदान मंजूर केले आहेत.
फलटण नगरपरिषदेमार्फत प्रधानमंत्री आवास योजना शहरी १.० या योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या BLC घटकांतर्गत एकूण १८५ घरकुले मंजूर असून त्यापैकी १७० घरकुले पूर्ण झालेली आहेत. नगरपरिषदेमार्फत घरकुला करिता आत्तापर्यंत ३,८८,२०,०००/- रु. (तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख वीस हजार) इतके अनुदान वाटप करण्यात आलेले आहे.