शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्त्वातील गुण आत्मसात केल्यास विद्यार्थी संस्कारक्षम होईल : प्राचार्य रविंद्र येवले

सेवाभारती फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प फलटणच्यावतीने शिंदेवाडी जिल्हा परिषद शाळेत गुरुपौर्णिमा संपन्न

। लोकजागर । फलटण । दि. 17 जुलै 2025 ।

‘‘आजचा विद्यार्थी संस्कारक्षम व आदर्श कसा घडेल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असून यासाठी विद्यार्थ्यांचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज घडण्यामध्ये त्यांच्या मातोश्री जिजामाता साहेब यांचा मोलाचा वाटा होता. शिवाजी महाराजांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा एक गुण जरी विद्यार्थ्यांनी आत्मसात केला तरी आजचा विद्यार्थी संस्कारक्षम होऊ शकतो’’, असे मत प्राचार्य रविंद्र येवले यांनी व्यक्त केले.

सेवाभारती फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प फलटण यांच्यावतीने शिंदेवाडी (ता.फलटण) येथील जिल्हा परिषद शाळेत गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य रविंद्र येवले बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा सौ.प्रतिभाताई शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास सेवाभारती फिरती विज्ञान प्रयोग शाळा प्रकल्प प्रमुख पोपटराव बर्गे, सह प्रमुख स्वानंद जोशी, प्रकल्प फलटण निधी प्रमुख प्रशांत धनवडे, सौ.रेवतीताई गोसावी, प्रकल्प शिक्षक योगेश ढेकळे, सौ. वर्षा बर्गे, छत्रपती शिवाजीराजे युवक संघाचे सचिनभैय्या भगत यांच्यासह प्रकल्प समिती सदस्य, विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ, कृषी महाविद्यालय, फलटणच्या कृषीकन्या आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

प्राचार्य रविंद्र येवले यांनी आपल्या मार्गदर्शनात, स्वामी विवेकानंद व रामकृष्ण परमहंस अशा गुरु – शिष्यांची उदाहरणे व सानेगुरूजी यांच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग सांगितले. सौ. प्रतिभाताई शिंदे यांनी गुरु परंपरेचे महत्त्व सांगताना प्राचीन काळातील अनेक दाखले दिले.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे व ज्येष्ठ नेते स्वर्गीय सुभाषराव शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वानंद जोशी यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक योगेश ढेकळे यांनी केले व सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत या संस्थेची महाराष्ट्रात जी सेवा कार्ये सुरू आहेत याची माहिती दिली. तसेच फिरती विज्ञान प्रयोगशाळा हा प्रकल्प फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सुरू करण्यापाठीमागचा उद्देश स्पष्ट केला. यानंतर गुरुपौर्णिमेच महत्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. शाळेचे शिक्षक श्री. भोसले यांनी देखील गुरुपौर्णिमा का साजरी केले जाते ? व गुरुपौर्णिमेचे महत्त्व भारतीय संस्कृतीमध्ये का आहे? याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यानंतर उपस्थित पालक व गुरुजनांचे पाद्यपूजन करण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यात छत्रपती शिवाजीराजे युवक संघाचे सचिनभैय्या भगत, प्रशांत धनवडे व शालेय शिक्षण समितीचे पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले. श्री. खोमणे सर यांनी या कार्यक्रमाचा लाभ शाळेतील विद्यार्थ्यांना घेता आला याबद्दल सेवा भारती फिरती प्रयोग विज्ञान शाळेचे आभार मानले.

Spread the love