आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गावरील उड्डाणपूलांना संतांची नावे द्यावीत : मनसेचे युवराज शिंदे यांचे पालखी सोहळा समितीला निवेदन

। लोकजागर । फलटण । दि. 17 जुलै 2025 ।

आळंदी ते पंढरपूर या पालखी महामार्गावर येणार्‍या सर्व उड्डाणपूलांना महाराष्ट्रातील साधुसंतांची नावे देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन मनसेचे उपजिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख डॉ.भावार्थ देखणे व विश्वस्त चैतन्य महाराज कबीर बाबा यांना समक्ष भेटून दिले. दरम्यान, मनसेने केलेल्या मागणीबाबत पालखी सोहळ्याचे प्रमुख डॉ. भावार्थ देखणे व विश्वस्त चैतन्य महाराज कबीर बाबा यांनी समाधान व्यक्त करून कौतुक केले. आळंदी येथे गेल्यानंतर लवकरच समितीच्या बैठकीत या विषयाबाबत सर्वांशी चर्चा करून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निवेदनात युवराज शिंदे यांनी म्हटले आहे की, आळंदी ते पंढरपूर या पालखी महामार्गावर केंद्रीय रस्ते विकास महामंडळ यांनी अनेक उड्डाणपूल बांधले आहेत. या सर्व उड्डाणपूलांना महाराष्ट्रातील विविध साधुसंतांची नावे देण्यात यावी. महाराष्ट्र हा शेकडो वर्षापासून साधू संतांचा प्रदेश म्हणून जगात ओळखला जात आहे. या सर्व साधुसंतांनी घालून दिलेल्या आदर्श व शिकवणीवरच महाराष्ट्राची आतापर्यंतची वाटचाल चालू आहे. संतांच्या उज्वल परंपरेचा सर्वच मराठी जणांना खूप मोठा अभिमान आहे. दरवर्षी होणार्‍या पालखी सोहळ्यामध्ये अनेक जाती धर्माचे तसेच गोरगरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव न मानता लहान थोर मंडळी मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने सामील होत आळंदी ते पंढरपूर पायी वारी करत असतात. जातीय व सामाजिक सलोख्याचे प्रतीक म्हणून ही या सोहळ्याकडे संपूर्ण जग पाहत असते. या मार्गावरील सर्व रस्त्यांची व उड्डाणपूलांची कामे अंतिम टप्प्यात आली असून याबाबतीत आपल्या स्तरावर शासनाकडे पाठपुरावा करून मार्गावरील सर्व उड्डाणपूलांना साधुसंतांची नावे देण्यात बाबत शासनाकडे आपण आग्रह धरावा.

Spread the love