सैनिकांचा सन्मान करणारा देशच आज जगावर वर्चस्व प्रस्थापित करू शकेल – उपप्राचार्य आबाजी धायगुडे

कारगिल विजय दिनी वीर पत्नींचा सत्कार

| लोकजागर | लोणंद | दि. ३१ जुलै २०२५ |

समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती देशासाठी काही ना काही करीत असते डॉक्टर, वकील, शेतकरी, व्यावसायिक, शिक्षक अशा सर्व क्षेत्रांमध्ये कार्य करणारे लोक देशाची सेवा करतात. परंतु देशाचे रक्षण करणारे जवान आणि सैनिकी अधिकारी हेच सर्वश्रेष्ठ सेवेकरी आहेत. ज्या देशांमध्ये सैनिकांचा योग्य सन्मान केला जाईल तोच देश आजच्या स्थितीत जगावर वर्चस्व प्रस्थापित करू शकतो, असे प्रतिपादन येथील मालोजीराजे विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे उपप्रचार्य आबाजी धायगुडे यांनी केले.

येथील मालोजीराजे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, लोणंद मध्ये २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा झाला. या दिनाचे औचित्य साधून विद्यालयांमध्ये वीर पत्नींचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने लोणंद पंचक्रोशीतील वीर पत्नी श्रीमती वनिता संतोष ठोंबरे, श्रीमती अर्चना प्रकाश शेळके व श्रीमती पुनम सुभाष कराडे यांचा विद्यालयाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला.

वीर पत्नी अर्पणा शेळके आपल्या सत्काराला प्रतिउत्तर देताना म्हणाल्या, देशाचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आणि ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणाची बलिदान दिले आहे त्यांचा आपण सर्वजण सन्मान राखूया आणि या देशाचे भविष्य उज्वल करूया. सर्व शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या वतीने त्यांनी सत्कार केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आणि एवढ्या बलिदानानंतरसुद्धा आम्हाला देशाची सेवा करण्याची संधी मिळाल्यास आम्ही अग्रेसर असू, अशी ग्वाही दिली. वीर पत्नींच्या अनुभव कथनाने सर्व एनसीसी कॅडेट भावुक झाले.

22 महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एम. ए.राजमन्नार (सेना मेडल) हे देखील 1999 च्या कारगिल युद्धाचे प्रमुख युद्धे होते. आज शासकीय कार्यक्रमा मध्ये त्यांचा व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा सन्मान सातारा सैनिकी शाळा येथे संपन्न झाला. त्यांनी ही विद्यालयातील या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

शासकीय कार्यक्रमांमध्ये प्रभात फेरी व कारगिल युद्धामध्ये सहभागी असणाऱ्या जवान आणि सैनिकी अधिकाऱ्यांचा सन्मान केला गेला.

मालोजीराजे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, लोणंदमध्ये वीर पत्नींचा सत्कार करण्याची संकल्पना प्राचार्य तथा रयत शिक्षण संस्थेचे समन्वय समिती सदस्य चंद्रकांत जाधव यांनी मांडली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

शहीद जवान संतोष ठोंबरे यांचा चिरंजीव कॅडेट आकाश ठोंबरे यानेही आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या वडिलांच्या शौर्याची गाथा त्याने कॅडेट समोर मांडताच विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये भारतीय सेना दला बद्दल विशेष आदर निर्माण झाला. विद्यालयाच्या विद्यार्थिनी उमा क्षीरसागर व अंकिता मराठे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षक मनोगतामध्ये एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट महेश जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना 22 महाराष्ट्र एनसीसी बटालियन सातारा यांनी दिलेल्या विशेष संधीबद्दल आभार मानले व जास्तीत जास्त कॅडेट अधिकारी तसेच सैन्य दलात भरती होतील अशी अशा व्यक्त केली. एनसीसीच्या माध्यमातून उत्तम नागरिक तयार होतील यासाठी एनसीसी विभागाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 22 महाराष्ट्र एनसीसी बटालियन साताराचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एम ए राजमन्नार (सेना मेडल) ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर कर्नल आनंद सिंग, सुभेदार मेजर तानाजी भिसे, ट्रेनिंग जेसीओ संभाजी शिंदे सर्व पीआय स्टाफ जे सी ओ, एन सी ओ, सिविल स्टाफ,लष्कर पार्टी यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक एनसीसी ऑफिसर विठ्ठल ठाकरे यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रा.गिरीश दाभाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्युनिअर कॉलेजच्या प्रा. सौ. सुवर्णा सरोदे, प्रा. रमेश लोखंडे, उप मुख्याध्यापक लक्ष्मण नेवसे, पर्यवेक्षक विष्णू काटकर, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.

सर्व कार्यक्रमाचे फलक लेखन कलाशिक्षक टि.के. पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन सर्व एनसीसी कॅडेट, खुष्णुदी बागवान, अनुष्का पवार, योगिता चांगण व वेदिका गोवेकर यांनी केले.

Spread the love