शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी माजी विद्यार्थी महत्त्वाचा दुवा : सौ. एम. डी. जाधव

| लोकजागर | फलटण | दि. ३१ जुलै २०२५ |

शाळा हे ज्ञानाचे मंदिर असून त्यातील विद्यार्थी हे जिवंत देव आहेत. त्या देवांची काळजी करणे काळाची गरज आहे. आधुनिक बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना योग्य ज्ञान द्यायचे असेल, योग्य अध्ययनाचे धडे द्यायचे असतील तर बदलत्या परिस्थितीनुसार तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी माजी विद्यार्थी महत्त्वाचा दुवा आहेत, असे मत रयत शिक्षण संस्था संचलित श्री जितोबा विद्यालय, जिंतीच्या मुख्याध्यापिका सौ. एम. डी. जाधव यांनी व्यक्त केले.

विद्यालयात आयोजित माजी विद्यार्थी सहविचार सभेत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर स्कूल कमिटीचे सदस्य राजेंद्र रणवरे, प्रकाश रणवरे, महादेव रणवरे, नवनाथ रणवरे, उपसरपंच शरद रणवरे, माजी विद्यार्थी व पत्रकार यशवंत खलाटे, शिक्षक ताराचंद आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ताराचंद आवळे म्हणाले, रयत शिक्षण संस्थेच्या ध्येयधोरणानुसार माजी विद्यार्थी संघटना बळकट करायच्या असून त्यासाठी त्याची योग्य बांधणी झाली पाहिजे. या संघटनेमध्ये जे पदाधिकारी असतील ते सतत शाळेसाठी कार्यप्रवण व शाळेसाठी वेळ देणारे असावेत. शाळेच्या भौतिक गरजा, व्यवसाय मार्गदर्शन, व्याख्याने व अध्ययन – अध्यापनाशी निगडित पोषक वातावरण योग्य पद्धतीचे निर्माण होणे काळाची गरज आहे. त्यासाठी माजी विद्यार्थी फार महत्त्वाचे आहेत.

यावेळी स्कूल कमिटीचे सदस्य प्रकाश रणवरे, महादेव रणवरे, माजी विद्यार्थी यशवंत खलाटे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या जमदाडे यांनी केले तर आभार अंकुश सोळंकी यांनी मानले. यावेळी राहुल रणवरे, अर्चना सोनवलकर, अमोल जाधव, शाहीन हनुरे, जे.एम. देशमुख तसेच माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love