विद्यार्थ्यांना नानांचे कार्य सोप्या पद्धतीने समजून येण्यासाठी ही पॉडकास्ट सिरीज उपयुक्त : अमर शेंडे
| लोकजागर | फलटण | दि. ३१ जुलै २०२५ |
मुंबईच्या सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी क्षेत्रात आपले अढळ स्थान निर्माण करणाऱ्या नाना शंकरशेट यांच्या जीवनावर आधारित पॉडकास्ट सिरीज नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. लेखक अमर शेंडे लिखित “मुंबईचे शिल्पकार नामदार जगन्नाथ नाना शंकरशेट” या चरित्रग्रंथावर आधारित या पॉडकास्टने रसिक श्रोत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. “आज नानांची १६० वी पुण्यतिथी आहे. विद्यार्थ्यांना नानांचे कार्य अगदी सोप्या पद्धतीने समजून येण्यासाठी ही पॉडकास्ट सिरीज उपयुक्त ठरेल”, असा विश्वास यानिमित्ताने नाना शंकरशेट यांचे चरित्र लेखक अमर शेंडे यांनी व्यक्त केला आहे.

या पॉडकास्ट सिरीज बाबत माहिती देताना अमर शेंडे यांनी सांगितले कि, “आपली एखादी साहित्यकृती आपल्याला आपली ओळख नव्याने करून देते असाच अनुभव सध्या मला आला. मुंबईचे शिल्पकार नामदार जगन्नाथ नाना शंकरशेट यांचे चरित्र मी तीन वर्षांपूर्वी लिहिले. मुंबईच्या विद्यापीठ अभ्यासक्रमातही या चरित्राचा समावेशही झाला. आता नव्याने या चरित्रावर आधारित मुंबई येथे छोट्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी पॉडकास्ट चे काम सुरू आहे. श्रीरंग शंकरशेट, त्यांच्या पत्नी व त्यांची आठ वर्षांची कन्या थीया हे काम करीत आहेत. विद्यार्थ्यांना नानांचे कार्य अगदी सोप्या पद्धतीने समजून येईल हा त्यांचा यामागील उद्देश आहे.”

“या पॉडकास्टमधून नाना शंकरशेट यांचे समाजकारण, ब्रिटिश सत्तेशी त्यांचे संबंध, मुंबईतील शिक्षण संस्थांची उभारणी, तसेच रेल्वे, दवाखाने, आणि समाजसुधारणा चळवळीत दिलेल्या योगदानाचा थेट अनुभव श्रोत्यांना घेता येणार आहे. संहितेची सखोल मांडणी, अभ्यासपूर्ण निवेदन आणि प्रभावी ध्वनीसंकल्पना यामुळे ही सिरीज ऐकणाऱ्याला त्या काळात नेऊन ठेवते. पॉडकास्ट
📸 Instagram: https://www.instagram.com/magicnanaajoba/
📘 Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61578238916776
▶️ YouTube: https://www.youtube.com/@magicnanaajoba
वरील लोकप्रिय अॅप्लिकेशन्सवर उपलब्ध असून विद्यार्थी वर्गासह इतिहास आणि समाजकार्य यांची आवड असणाऱ्यांनी याची नक्की दखल घ्यावी”, असे आवाहन अमर शेंडे यांनी केले आहे.
