| लोकजागर | मुंबई | दि. ३१ जुलै २०२५ |
ईव्हीएममध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड करता येत नाही. त्यामुळे निकालांबाबत शंका घेण्याचे कारण नाही, असे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

आयोगाच्या 17 जून 2025 च्या सूचनांनुसार, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी 10 उमेदवारांच्या विनंतीनुसार 10 विधानसभा मतदारसंघांमधील मतदार युनिट (BU), नियंत्रण यंत्र (CU) व व्हीव्हीपॅट (VVPAT) यांची तपासणी केली. सर्व यंत्रांनी निदान चाचण्या उत्तीर्ण केल्या व व्हीव्हीपॅट स्लिप आणि ईव्हीएम निकालात कोणताही फरक आढळला नाही.

या प्रक्रियेत 8 उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तपासणी पाहिली. एकूण 48 मतदार युनिट, 31 नियंत्रण यंत्रे आणि 31 व्हीव्हीपॅट यांची तपासणी झाली. दोन उमेदवारांनी उपस्थित राहणे टाळले.
काही मतदारसंघांमध्ये (कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, खडकवासला, माजलगाव) मायक्रोकंट्रोलर व मेमरी पडताळणीसाठी निदान चाचणी घेण्यात आली. तर पनवेल, अलीबाग, आर्णी, येवला, चंदगड, कोल्हापूर उत्तर आणि उर्वरित माजलगाव येथील यंत्रांवर निदान चाचणीबरोबरच मॉक पोल घेण्यात आला. सर्व चाचण्यांमध्ये यंत्रे योग्य कार्यरत असल्याचे प्रमाणित झाले.
