| लोकजागर | फलटण | दि. ८ ऑगस्ट २०२५ |
मराठा व ओबीसी समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा डाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आखला असून तो कधीही यशस्वी होणार नाही, असे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. आम्ही आणि ओबीसी बांधावर राहतो, त्यामुळे कधीही वाद निर्माण करणार नाही. मात्र, आता मराठा समाज आरक्षण मिळेपर्यंत लढा देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

29 ऑगस्ट रोजी ‘चलो मुंबई’ या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर फलटण येथील सजाई गार्डन येथे अखंड मराठा समाजाची बैठक मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. यावेळी मनोज जरांगे पाटील बोलत होते. त्यांनी आरोप केला की, फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या खर्चावर ओबीसी नेत्यांना गोव्याला नेऊन समुद्रकिनारी फिरवले, जेणेकरून मराठा-ओबीसी वादाला खतपाणी मिळावे. मात्र, हा डाव फसणार आहे. “ओबीसींसाठी काय केलं? मराठ्यांना आरक्षण नको, नोकऱ्या नको, आणि फक्त राजकारणासाठी वापर – हा त्यांचा उद्देश आहे,” असे ते म्हणाले.

जरांगे पाटील म्हणाले, “फडणवीस यांनी कधी दलित-मुस्लिम वाद, तर कधी धनगर समाजाचा वाद निर्माण केला. पण आता मराठ्यांनी त्यांचा डाव ओळखला आहे. नुकतेच ओबीसी अधिवेशन घेऊन मराठ्यांना भुलवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, आता पश्चिम महाराष्ट्रातील एकही मराठा घरी बसणार नाही. भाजपासह सर्वच पक्षातील मराठा नेते ‘चलो मुंबई’च्या हाकेसाठी तयार आहेत. प्रत्येकाने मोटारसायकल किंवा चारचाकीने कुटुंबासह मुंबईत धडक देणार असून आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही.”

त्यांनी पुढे आरोप केला, “देवेंद्र फडणवीस घाण विचारांचे असून मराठा समाज संपविण्याचा घाट त्यांनी घातला आहे. पण आता संपूर्ण महाराष्ट्रातील मराठे एकवटले आहेत. 29 ऑगस्टला कोट्यवधी मराठे मुंबईत धडक देणार आहेत. फडणवीस तुमच्या मुलांना औषध देऊन मारण्याचा डाव करत आहेत, नोकरीला लागू नयेत असा प्रयत्न आहे. ओबीसींसाठी लढायचे पण मराठ्यांसाठी नाही – हे त्यांनी अनेकदा दाखवून दिले आहे. त्यामुळे मराठा समाज पेटून उठला आहे.”

धनंजय मुंडे याबाबत भाष्य
पत्रकारांनी विचारले की धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद देण्याच्या हालचाली सुरू आहेत, यावर जरांगे पाटील म्हणाले, “अजितदादा काय पण फडणवीस सुद्धा त्यांना मंत्रिपद देऊ शकणार नाहीत. आणि दिले तर त्यांना पाश्चाताप होईल. धनंजय मुंडे आपल्या भावाच्या मृत्यूच्या प्रकरणात भावजयाला न्याय देऊ शकले नाहीत, तसेच संतोष देशमुख खुनात अनेक फोन कॉल केल्याचे त्यांच्या भावाने सांगितले आहे.”