| लोकजागर | सातारा | दि. १० ऑगस्ट २०२५ |
रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या मदतीची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी मन लावून शिक्षण घ्यावे आणि समाजासाठी योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. सुधीर भिडे यांनी केले.

रविवारी श्री. अशोकराव गोडबोले यांच्या ‘श्रीराम’ निवासस्थानी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात आली. ट्रस्टचा हा उपक्रम सलग 54व्या वर्षी राबवला गेला असून, अनेक होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यास यामुळे हातभार लागतो. पालकांसाठीही हा दिलासादायक ठरतो, असे मत डॉ. भिडे यांनी व्यक्त केले.

या वेळी डॉ. सौ. मीरा दीक्षित यांनी रा. ना. गोडबोले यांच्या आठवणी जागवल्या आणि ट्रस्टच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. “या मदतीतून शिक्षण पूर्ण करून अशी कामगिरी करा की तुम्हाला ‘सातारा भूषण’ पुरस्कारासाठी निवड व्हावी,” अशी अपेक्षा त्यांनी विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली.

सौ. बकुल फाटक यांनी विद्यार्थ्यांना कष्ट करून मोठे नाव कमवावे आणि पालकांच्या कष्टाचे पांग फेडावे, असे सांगितले. डॉ. अच्युत गोडबोले यांनी प्रास्ताविकात ट्रस्टच्या उपक्रमांची माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत श्री. अशोकराव गोडबोले यांनी केले, सूत्रसंचालन प्रद्युम्न गोडबोले यांनी केले तर डॉ. चैतन्य गोडबोले यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला उदयन गोडबोले, आयडीबीआय ट्रस्टच्या मानसी माचवे व सहकारी, प्रा. अविनाश लेवे-देशमुख, विजय मांडके, श्रीकांत कात्रे, जाधव तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
पुढील कार्यक्रम 19 ऑगस्टला
मंगळवार, दि. 19 ऑगस्ट रोजी साताऱ्यातील प्रतापगंज पेठ येथील आयडीबीआय ट्रस्ट सभागृहात शैक्षणिक मदत वाटपाचा पुढील कार्यक्रम होणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांना पत्रे पाठवण्यात येणार असल्याची माहिती डॉ. अच्युत गोडबोले व प्रद्युम्न गोडबोले यांनी दिली.