| लोकजागर | फलटण | दि. १२ ऑगस्ट २०२५ |
फलटणजवळील जाधववाडी (फ) उपनगरातील महावितरण वीज ग्राहकांनी कोणतीही पूर्व परवानगी न घेता स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे. या संदर्भात सर्व सदनिका धारकांनी महावितरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप ग्रामोपाध्याय यांना निवेदन देऊन तातडीने काम थांबविण्याची मागणी केली. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

जाधववाडीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य दीपकराव सपकळ यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी भगवानराव शिंदे, भगवानराव गायकवाड घाडगे, जगदाळे, राजेंद्र ढालपे, जगताप, गणेश नाळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामस्थांनी स्पष्ट केले की, त्यांच्या संमतीशिवाय आणि माहिती न देता हुकूमशाही पद्धतीने स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू करू नये. तसेच, वीज दरवाढ आणि अनपेक्षित वीज बिल येण्याची भीती असल्याने स्मार्ट मीटरची सक्ती नागरिकांवर लादू नये. अन्यथा, वीज वितरण कंपनीविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.
