फलटणमध्ये ‘हर घर तिरंगा’ रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

| लोकजागर | फलटण | दि. १२ ऑगस्ट २०२५ |

हर घर तिरंगा 2025 उपक्रमांतर्गत फलटण प्रशासनाच्या वतीने आयोजित तिरंगा रॅलीला शहरातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षक आणि विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. “भारत माता की जय” व “वंदे मातरम्”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला.

रॅलीपूर्वी उपस्थितांनी संविधान दक्षतेची शपथ घेतली. उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर, मुख्याधिकारी निखिल मोरे, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, नगरपरिषद, तहसील कार्यालय, पंचायत समिती, तसेच शहरातील सर्व शासकीय कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी, विविध सामाजिक संघटना आणि शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, विद्यार्थी-शिक्षक यात सहभागी झाले होते.

तहसीलदार कार्यालयापासून रॅलीला प्रारंभ झाला. महात्मा फुले चौक, गजानन चौक, उमाजी नाईक चौक, भगवान महावीर चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे रॅली पुन्हा तहसीलदार कार्यालय येथे येऊन संपन्न झाली.

मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी विविध सामाजिक संघटना, शाळा आणि प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी यांचे सहकार्याबद्दल आभार मानले. स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली आयोजित करण्यात आल्याचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी सांगितले.

Spread the love