| लोकजागर | फलटण | दि. १६ ऑगस्ट २०२५ |
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या दालवडी (ता.फलटण) येथील श्रीमंत सगुणामाता माध्यमिक विद्यालयात शालांतर्गत क्रीडा स्पर्धांना प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम यांच्या शुभहस्ते प्रारंभ झाला. या उद्घाटन प्रसंगी गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य प्रा. सी. डी. पाटील, स्कूल कमिटीचे चेअरमन श्री. नितीनशेठ गांधी, मुख्याध्यापिका सौ. सुवर्णशीला कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रारंभी मुख्याध्यापिका सौ. कांबळे यांनी मान्यवरांचे स्वागत करून स्पर्धांचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी त्यांनी कबड्डी, खो-खो, ॲथलेटिक्स व व्हॉलीबॉलसह देशी खेळांना प्राधान्य देण्यात आल्याचे सांगितले.
उद्घाटन प्रसंगी श्री. अरविंद निकम म्हणाले की, “खेळामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो, खेळाडू वृत्ती जोपासली जाते तसेच नेतृत्वगुणांचा विकास होतो. या स्पर्धांतूनच भविष्यात दर्जेदार खेळाडू घडतात.” असे सांगून त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

तसेच श्री. नितीनशेठ गांधी व प्रा. सी. डी. पाटील यांनीही खेळाडूंना प्रोत्साहनपर शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी ज्येष्ठ शिक्षक श्री. कोलवडकर, श्री. सूळ, श्री. जाधव, श्री. पाडवी, श्रीमती तरटे, श्रीमती मोहिते तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री. इतराज व श्री. कारंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. या वेळी दालवडी पंचक्रोशीतील क्रीडाप्रेमी, पालक व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
