साताऱ्यात आज धैर्याचे जंगी स्वागत

जनता बँक, मावळा फौंडेशन, गुरुकूल स्कूलतर्फे शिवतीर्थावर आयोजन

| लोकजागर | सातारा | दि. २१ ऑगस्ट २०२५ |

एव्हरेस्ट बेस कॅम्प, आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर किलीमांजारो… आता युरोप खंडातील सर्वात उंच शिखर माऊंट एलब्रुस सर करणाऱ्या साताऱ्याची ‘अजिंक्यकन्या’ धैर्या ज्योती विनोद कुलकर्णी हिचे गुरुवारी (दि. २१) सायंकाळी सात वाजता साताऱ्यातील पोवई नाका येथील शिवतीर्थावर जंगी स्वागत केले जाणार आहेत.

अजिंक्यतारा किल्ल्याच्या अंगाखांद्यावर बागडणाऱ्या धैर्याने ट्रेकींगला फॅशन बनवत प्रारंभी जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या एव्हरेस्टचा बेस कॅम्प सर केला. त्यावेळी तिचे वय अवघे १२ वर्षे होते. आई-वडिल, पालकांशिवाय ही मोहिम पार पाडणारी ती बहुदा भारतातील पहिली ठरली. त्यानंतर लगेच तिने आफ्रिका खंडातील सर्वात उंच असलेले किलीमांजारो शिखर सर केले. त्यानंतर नुकतेच तिने युरोप खंडातील माऊंट एलब्रुस हे शिखर सर केले आहे.
वयाच्या अवघ्या १३ वर्षांत तीन खंडातील तीन शिखरे सर करणारी, तीही पालक सोबत नसतानाही ही कामगिरी करणारी धैर्या भारतातील पहिली मुलगी ठरली आहे, याचा समस्त साताकरांना अभिमान आहे. जनता सहकारी बँक, मावळा फौंडेशन व गुरुकूल स्कूल, गुजराथी अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीतर्फे धैर्याच्या स्वागताचे नियोजन केले जात आहे. धैर्या गुरुवारी सायंकाळी सात वाजता साताऱ्यात येणार असून, शिवतीर्थावर तिचे जंगी स्वागत केले जाणार आहे. धैर्याचे कौतुक करुन, तिला शाब्बासकी देण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जनता सहकारी बँकेचे चेअरमन अमोल मोहिते, मावळा फौंडेशनचे सचिव नंदकुमार सावंत यांनी केले आहे.

धैर्याची कामगिरी

एव्हरेस्ट बेस कॅम्प – १७,५९८ फूट
माऊंट किलीमांजारो – १९,३४१ फूट
माऊंट एलब्रुस – १८, ५१० फूट

Spread the love