साताऱ्यात हरित गणेशोत्सवाची चळवळ : जिल्हा प्रशासनाचा पर्यावरणपूरक उपक्रम

| लोकजागर | सातारा | दि.2 सप्टेंबर 2025 |

सातारा जिल्हा यंदा हरित आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलत आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात विसर्जन आणि निर्मल्याच्या व्यवस्थेसाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे.

1423 ग्रामपंचायतींमध्ये नैसर्गिक तळी व पडक्या विहिरी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, तर 488 ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडांची निर्मिती झाली आहे. विसर्जनानंतर मूर्ती परत कुंभारांकडे सुपूर्द करण्याची अनोखी व्यवस्था करण्यात आली असून 221 ग्रामपंचायतींनी त्यासाठी कुंभारांची यादी तयार केली आहे.

निर्मल्याच्या व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला आहे. 1352 ग्रामपंचायतींना ट्रॅक्टर, 280 ग्रामपंचायतींना घंटागाड्या व डस्टबिन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय 1368 ग्रामपंचायतींमध्ये संकलित निर्मल्यापासून जैविक खत निर्मिती करण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करण्याचा हा एक आदर्श प्रयत्न ठरणार आहे, अशी माहिती प्रज्ञा माने-भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वच्छता विभाग यांनी दिली.

ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मा. राहुल देसाई यांनी २ व ६ सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणावर विसर्जन होईल असे सांगितले. प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी संपर्क अधिकारी नेमल्याने अंमलबजावणी अधिक परिणामकारक होणार आहे.

या उपक्रमात सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, युवक मंडळे, सामाजिक संस्था, विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व स्थानिक नागरिक एकत्र सहभागी होणार असून लोकसहभागामुळे उत्सव अधिक यशस्वी ठरेल, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी मा. याशनी नागराजन यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी मा. संतोष पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की विसर्जन फक्त कृत्रिम तलावात करावे, निर्मल्याचे योग्य संकलन करावे आणि भावी पिढ्यांसाठी शुद्ध, सुरक्षित व हरित वारसा जपण्यासाठी पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा.

या उपक्रमामुळे सातारा जिल्हा संपूर्ण देशासाठी आदर्श हरित गणेशोत्सव साजरा करणारा ठरणार आहे.

Spread the love