सासकल परिसरात ऊस पिकावर हुमणी किडीचा वाढता प्रादुर्भाव – शेतकऱ्यांची चिंता वाढली.
| लोकजागर | फलटण | दि २ सप्टेंबर २०२५ |
फलटण तालुक्यातील सासकल परिसरात ऊस पिकावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे. हवामानातील बदल आणि पावसाचा अभाव यामुळे हुमणीच्या अळींची संख्या वाढत आहे. जमिनीत ऊसाच्या मुळ्यांवर कुरतड करत असल्याने झाड निस्तेज होऊन वाळकं पडते. एका बेटाखाली साधारण दहा-बारा अळ्या सापडतात. त्यामुळे हेक्टरी १५ ते २० टनापर्यंत ऊस उत्पादन घटते.२०२५

सहायक कृषी अधिकारी सचिन जाधव यांनी सांगितले की, रासायनिक औषधांच्या वापरामुळे पर्यावरण व आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याने जैविक पद्धतीने नियंत्रण करणे अधिक फायदेशीर आहे. हुमणीवर प्रभावी नियंत्रणासाठी बव्हेरिया बसियाना, मेटारायझियम अॅनिसोपली या परोपजीवी बुरशी तसेच एंटोमोपॅथोजेनिक सूत्रकृमी (ईपीएन) यांचा वापर करावा.
मे-जून महिन्यात आळवणी पद्धतीने या जैविक द्रावणाचा वापर केल्यास चांगला परिणाम दिसून येतो. याशिवाय सामुदायिकरीत्या प्रकाश सापळे बसवणे, उन्हाळ्यात खोल नांगरट करणे हेही उपाय उपयुक्त ठरतात. वेळेत उपाययोजना केल्यास हुमणीमुळे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येते.
