जनसुरक्षेच्या नावाखाली लोकशाहीचा घोट – अॅड. असीम सरोदे यांचा आरोप

| लोकजागर | सातारा | दि २सप्टेंबर २०२५ |


केंद्र व राज्य सरकार जनसुरक्षेच्या नावाखाली लोकशाहीचा घोट घेत आहेत, असा गंभीर आरोप संविधान विश्लेषक व उच्च न्यायालय कोल्हापूर सर्किट बेंचचे विधिज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी साताऱ्यात केला.

कॉम्रेड व्ही. एन. पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त कॉ. व्ही. एन. पाटील स्मारक समितीच्या वतीने दैवज्ञ सांस्कृतिक भवनात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी कॉ. अतुल दिघे होते.

या वेळी बोलताना अॅड. सरोदे म्हणाले की, “जनसुरक्षा कायद्याचा वापर हा जनहितासाठी नसून असंघटित, कामगार, दलितांच्या चळवळी दडपण्यासाठी केला जात आहे.” न्यायव्यवस्थेवर जनतेचा विश्वास डळमळीत झाला, तर लोकशाहीचा कडेलोट होईल, असा इशारा त्यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा हे देशाला लागलेले ग्रहण असल्याची टीका करताना सरोदे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी जनसुरक्षा कायद्याचा गैरवापर करत आहेत. तसेच, पालकमंत्री शंभूराजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून कायद्याची पायमल्ली केली असून, हे लोकशाहीला शोभणारे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजप नेते निलेश राणे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, “माकडासारख्या उड्या मारण्याऐवजी बंदराचे काम नीट करावे, समाजात फूट पाडण्याचे राजकारण बंद करावे.”

अध्यक्षस्थानावरून बोलताना कॉ. अतुल दिघे यांनी कॉ. व्ही. एन. पाटील यांच्या सामाजिक व राजकीय योगदानाचा गौरव केला आणि सध्याच्या सरकारच्या विरोधात संघर्ष सुरू ठेवण्याचा इशारा दिला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कॉ. व्ही. एन. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. प्रास्ताविक विजय मांडके यांनी केले. कॉ. वसंतराव नलावडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कॉ. विजय निकम यांनी स्वागत केले. व्याख्यानाच्या वेळी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते कॉ. त्र्यंबक ननावरे यांचा अॅड. असीम सरोदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आभारप्रदर्शन कॉ. प्रमोद परामणे यांनी केले.

या व्याख्यानाला कार्यकर्ते, विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी तसेच युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love