रीडर बनाल तरच लीडर बनाल : ताराचंद्र आवळे

| लोकजागर | फलटण | दि. २ सप्टेंबर २०२५ |

“वाचाळवीर होण्यापेक्षा वाचनविर झालात, तरच जीवन खऱ्या अर्थाने बदलेल. वाचन संस्कृती वाढवली, तर तुम्ही उत्तम रीडर व्हाल आणि भविष्यात लीडर बनाल,” असे प्रतिपादन माणदेशी साहित्यिक व समुपदेशक ताराचंद्र आवळे यांनी केले.

पाच पांडव सेवा संघ संचलित पाच पांडव प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, अलगुडेवाडी (ता. फलटण) येथे ३१ ऑगस्ट रोजी भटके विमुक्त दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

आवळे पुढे म्हणाले की, “शिक्षण व संस्कारामुळे भटक्या विमुक्त जाती जमातींचे जीवनमान उंचावले आहे. आज अनेक जण अधिकारी व पदाधिकारी पदावर कार्यरत आहेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे व मिळवून देण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा. महापुरुषांच्या त्यागातून निर्माण झालेले स्वातंत्र्य आपण जबाबदारीने जपले पाहिजे.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक संतोष नाळे होते. यावेळी मुख्याध्यापक विजय शिंदे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर. ए. माळी, ज्येष्ठ शिक्षक प्रवीण साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीबा ज्योतीबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे व क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. तसेच शालेय परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण साळुंखे यांनी केले, सूत्रसंचालन विजय शिंदे यांनी केले तर आभार मधुकर देवकाते यांनी मानले. यावेळी आश्रमशाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींसह कर्मचारी व स्थानिक मान्यवर उपस्थित होते.

Spread the love