| लोकजागर | फलटण | दि. ६ सप्टेंबर २०२५ |
नवदुर्ग गणेशोत्सव मंडळाच्या स्थापना वर्षाचे ६० वे वर्ष यंदा उत्साहात साजरे केले जात आहे. गेल्या सहा दशकांमध्ये मंडळाने विविध पौराणिक आणि ऐतिहासिक देखावे सादर करून फलटणकरांच्या मनात अमिट ठसा उमटवला आहे. यंदा मंडळाने सादर केलेला ‘भुताचा वाडा’ हा देखावा विशेष आकर्षण ठरत असून, फलटण शहरासह सांगवी, विडणी, झिरकवाडी आणि आसपासच्या ग्रामीण भागातील गणेशभक्त मोठ्या संख्येने हा देखावा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित राहात आहेत. गर्दीच्या उच्चांकाचा विक्रमही या देखाव्याने मोडला आहे.

या देखाव्यातून बालकलाकारांनी लहान मुलांना मोबाईलपासून दूर राहण्याचे आवाहन, आई-वडिलांचे ऐकावे, अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे यांसारख्या प्रबोधनपर संदेशांचा समावेश केला आहे. त्यामुळे धार्मिकतेसोबतच समाजप्रबोधनाचा संदेशही पोहोचवला जात आहे.
मंडळाच्या आयोजनात महिलांचा सहभागही विशेष उल्लेखनीय आहे. खाव्याच्या नियोजनापासून ते गर्दी नियंत्रणापर्यंत महिला वर्गाचे महत्त्वपूर्ण सहकार्य मिळत आहे. तसेच फलटण पोलीस स्टेशनच्यावतीनेही शिस्तबद्ध व सुरळीत व्यवस्थापनासाठी योग्य ती मदत केली जात आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मंडळाने या देखाव्याचे व्हिडिओ इंस्टाग्रामसह सोशल मीडियावर प्रसारित केले असून, केवळ तीन दिवसांतच अनेक व्हिडिओंना दोन लाखांहून अधिक प्रेक्षकांनी पाहिले आहे.
मंडळाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री. पोपटराव बर्गे यांनी सांगितले की, “गेल्या सहा दशकांप्रमाणेच यापुढेही समाजकार्य आणि प्रबोधनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत मंडळ उत्कृष्ट कामगिरी करत राहील.”
