| लोकजागर | फलटण | दि. ६ सप्टेंबर २०२५ |
सभासदांचा विश्वास जपत, स्वच्छ व पारदर्शक कारभार करत महाराजा मल्टीस्टेट बँक सातत्याने प्रगतिपथावर आहे. या कार्यपद्धतीमुळे संस्थेचा प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असून भविष्यात महाराजा मल्टीस्टेटच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी केले.

महाराजा मल्टीस्टेटच्या १५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून श्री. भोसले बोलत होते. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकीहाळ, सद्गुरु पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, सर्व संचालक व शाखा कार्यकारी समितीचे चेअरमन उपस्थित होते.
श्री. भोसले म्हणाले, “काटकसरीने व पारदर्शकपणे संचालक मंडळाने कारभार केल्याने आज महाराजा मल्टीस्टेटला तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. कोअर बँकिंग सुविधा व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संस्थेचे कामकाज सुरळीतपणे सुरू आहे. सभासदांच्या मागणीवरून ७५ वर्षांवरील ठेवीदारांना अर्धा टक्का अधिक व्याजदर देण्याचा निर्णय घेतला आहे.”
प्रास्ताविक करताना संस्थेचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले यांनी माहिती दिली की सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात संस्थेस १ कोटी ५६ लाख २३ हजार रुपयांचा नफा झाला असून १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला आहे. तसेच नवीन शाखांचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवले असून मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच शाखा सुरू केल्या जातील.
संस्थेचे सीईओ संदीप जगताप यांनी विषयपत्रिकेचे वाचन व सूत्रसंचालन केले. संचालक शिवराज नाईक निंबाळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. सभेस संचालक मंडळासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. सभा खेळीमेळीत पार पडली.
