| लोकजागर | फलटण | दि. १२ सप्टेंबर २०२५ |
फलटण तालुक्यातील साखरवाडी येथे नामांकित पॅथॉलॉजिस्टच्या नावाने व बनावट सहीने लॅबोरेटरी रिपोर्ट तयार करून रुग्ण, डॉक्टर तसेच विमा कंपन्यांची फसवणूक करणारे रॅकेट फलटण ग्रामीण पोलिसांनी उधळून लावले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून ‘धन्वंतरी लॅबोरेटरी’चा चालक विशाल नाळे याला अटक केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

ही धक्कादायक फसवणूक तेव्हा उघडकीस आली, जेव्हा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सुप्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट डॉ. ब्रम्हानंद टाले यांच्याकडे एका विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी साखरवाडीतील ‘धन्वंतरी लॅब’चे काही रिपोर्ट पडताळणीसाठी आणले. या रिपोर्टवर डॉ. टाले यांचे नाव, पदवी व बनावट सही छापलेली असल्याचे दिसून आले. याबाबत डॉ. टाले यांनी, आपला या लॅबशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करत १० सप्टेंबर रोजी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, धन्वंतरी लॅबोरेटरीमध्ये पॅथॉलॉजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेला कोणताही नोंदणीकृत तज्ज्ञ नसतानाही अवैधपणे व्यवसाय सुरू होता. आरोपींनी कायद्याला चकवा देण्यासाठी डॉ. टाले यांच्या नावाने व सहीने बनावट रिपोर्ट तयार करून ते प्रमाणित असल्याचे भासवले होते.
डॉ. टाले यांच्या तक्रारीवरून फलटण ग्रामीण पोलिसांनी लॅब चालक विशाल नाळे, डॉ. बाळासाहेब राऊत व इतर दोन जणांविरुद्ध फसवणूक, बनावटगिरी आदी गंभीर कलमांखाली गुन्हा (गु. रजि. क्र. ६४३/२०२५) दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत विशाल नाळे याला अटक केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर व उपविभागीय पोलीस अधिकारी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार करीत आहेत.
