| लोकजागर | फलटण | दि. १३ सप्टेंबर २०२५ |
“पौगंडावस्थेत होणारे शारीरिक आणि मानसिक बदल ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून, त्याला न घाबरता शास्त्रीय दृष्टिकोनातून सामोरे जायला हवे,” असा मोलाचा सल्ला डॉ. सौ. उज्ज्वला म्हेत्रे यांनी किशोरवयीन मुलींना दिला. सेवा भारती, पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने बरड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित विशेष मार्गदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

शनिवार, दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित या कार्यक्रमात इयत्ता ७ वी ते १० वी मधील तब्बल १४० विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. डॉ. उज्ज्वला म्हेत्रे यांनी मुलींशी थेट संवाद साधत वाढत्या वयातील बदल, थायरॉईडची समस्या, ‘गुड टच’ व ‘बॅड टच’ बाबतची जागरूकता आणि मासिक पाळी स्वच्छता यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी मुलींनीही न लाजता आपल्या अनेक शंका व समस्या डॉक्टरांपुढे मांडल्या, ज्यांचे त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत निरसन केले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने झाली. श्री. योगेश ढेकळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या महत्त्वपूर्ण आयोजनाबद्दल सौ. शेख मॅडम यांनी सेवा भारती संस्थेचे आभार मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. पोपट बर्गे, श्री. प्रशांत धनवडे, श्री. विलास दाणी, श्री. आप्पासाहेब दाणी, श्री. उदय नाळे यांच्यासह अनेक मान्यवर आणि शिक्षक उपस्थित होते. श्री. प्रशांत धनवडे व श्री. विलास दाणी यांनी प्रवासासाठी आपली गाडी देऊन मोलाचे सहकार्य केले, असे आयोजकांनी सांगितले. एकूण १५६ जणांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.


 
										 
 
		 
 
		 
		