। लोकजागर । फलटण । दि. 21 सप्टेंबर 2025 ।
फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा सामाजिक व सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तीमत्त्व हरिष चंदरराव काकडे तथा नाना यांचे आज रविवार दि. 21 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता फलटण येथे दुःखद निधन झाले. आज रविवारी दुपारी 2.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 2 मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
हरिष काकडे यांच्या कार्याचा संक्षिप्त परिचय –
सातारा जिल्हा महाविद्यालय विद्यार्थी संघटना :
सातारा जिल्हा महाविद्यालय विद्यार्थी संघटनेत नानांनी उपाध्यक्ष पद भूषवले.या संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री लक्ष्मण माने होते.त्यांच्यासोबत ही नानांनी काम केले.विभागीय बैठका घेतल्या.सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी बैठक आयोजित करून त्यांच्या हक्कांसाठी लढा दिला.नामांतरासाठी निघालेल्या लाँगमार्चमध्ये ही त्यांचा सहभाग होता.यामध्ये जेष्ठ पत्रकार विजय मांडके, रामनाथ चव्हाण,पार्थ पोकळे, अॅड. जी.बी माने यांच्या बरोबर काम करून वस्तीगृह, शिष्यवृत्ती यासारख्या प्रश्नावर लढा दिला.
सातारा जिल्हा खरेदी विक्री संघाचे संचालक
या संघात अनेक वर्षे संचालक,उपाध्यक्ष म्हणून दैदिप्यमानकार्य नानांनी केले. यामध्ये किसनवीर, माजी आमदार लालसिंग शिंदे, माजी आमदार बाबुराव घोरपडे, केशवराव पाटील,लक्ष्मण पाटील हे जिल्हा बँकेचे प्रतिनिधी म्हणून सातारा जिल्हा खरेदी विक्री संघावर होते.तर मदन पिसाळ हे निवडून आले होते.यांच्यासारख्या लोकांसोबत जवळ जवळ 17 वर्षे या संघात काम केले.
सातारा जिल्हा मागासवर्गीय सुधार महासंघ अध्यक्ष
या महासंघाच्या माध्यमातून नानांनी अनेकांना मदत केली. त्यावेळी बॅ. अंतुले यांनी संपूर्ण बॅकलॉक भरण्याचा आदेश दिला होता.यावेळी विदर्भातील काँग्रेसचे नेते नाशिकराव तिरपुडे यांनी सेवा योजना कार्यालयाची जबाबदारी स्वयंसेवी संस्थाना दिली होती.यात त्यांनी सातारा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून नानांची निवड केली. मंगळवार पेठेतील 9 उमेदवारांना तलाठी पदासाठी नानांनी शिफारस केल्याने त्यांची तलाठी म्हणून निवड झाली. त्यांनी अनेक खात्यातील वनरक्षक, महसूल,पाठबंधारे या खात्यांसह अनेक खात्यातील पात्र उमेदवारांना नानांनी संधी दिली.आणीबाणीच्या काळात 20 कलमी कार्यक्रमांतर्गत असणार्या जमीन वाटप समितीवर ही ते होते.
महात्मा फुले विचार प्रसारक मंडळ 1971 साली कार्यरत
या महात्मा फुले विचार प्रसारक मंडळाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात नानांचा सिहांचा वाटा होता.व्याख्यानमालेसह निबंध, वक्तृव,रांगोळी स्पर्धेचे आयोजन ही अनेक वेळा केले गेले.
पुणे आकाशवाणी केंद्रावर युवा वाणी सदरात विचार मांडण्याची संधी
आकाशवाणी केंद्रावर प्रसारित होणार्या युवा वाणी या सदराखाली मला काय वाटते या शीर्षकाखाली सुरु असणार्या कार्यक्रमात नानांना संधी मिळाली होती. यामध्ये पुणे आकाशवाणी केंद्रावर 8 मिनिटे नानांनी आपले विचार व्यक्त केले.
नगरसेवक
2001 ते 2006 या कालावधीत नानांनी नगरसेवक म्हणून कार्य केले. त्या काळात त्यांनी महात्मा फुले कामगार वसाहतीत 2 समाज मंदिरे उभारली.सांडपाण्याची व्यवस्था,अंतर्गत रस्ते अशी विविध कामे केली. आज कामगार वसाहतीत असणारे बुध्द विहार त्यांच्याच प्रेरणेमुळे उभे राहिले.
नानांनी विविध पदावर काम केले म्युनिसिपल कामगारांच्या न्यायी हक्कांसाठी प्रयत्न केले. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी संधी दिल्यानंतर सातारा जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर ही त्यांनी प्रभावी काम केले आहे.
त्यांच्या निधनामुळे फलटणच्या सामाजिक आणि सहकार क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.


