। लोकजागर । फलटण । दि. 24 सप्टेंबर 2025 ।
रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तसेच विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्राशी संबंधित रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल, जाधववाडीच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. प्रशालेचे विद्यार्थी देवेंद्र महेश सुतार आणि शिवराज शेंडे यांनी फोक रेस – इंटरमीडिएट प्रकारात राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावून फलटण तालुक्याचा मान उंचावला आहे.

पुण्यातील एमआयटी, लोणी काळभोर येथे 20 व 21 सप्टेंबर रोजी या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन झाले होते. देशभरातील 2000 हून अधिक संघ आणि सुमारे 5000 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. या तीव्र स्पर्धेत फलटणच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश विशेष उल्लेखनीय ठरले.

या कामगिरीबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व विधानपरिषद सदस्य श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि प्रशासकीय अधिकारी अरविंद निकम यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मुख्याध्यापिका अंजुम शेख, रोबोटिक्स शिक्षक आकाश साळुंखे व अनिकेत माने यांचेही कौतुक करण्यात आले.
