। लोकजागर । फलटण । दि. ३० सप्टेंबर २०२५ ।
फलटण तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी पूरग्रस्तांसाठी सढळ हाताने मदत पुढे केली. मराठा क्रांती मोर्चा आणि सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने गोळा करण्यात आलेले संसारोपयोगी साहित्य, शैक्षणिक साहित्य व औषधे असे दोन ट्रक तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्याकडे सुपूर्द करून रवाना करण्यात आले.

मंगळवार, दि. ३० सप्टेंबर रोजी झालेल्या या उपक्रमात धान्य, किराणा किट, कांदे-बटाटे, भाज्या, नवीन साड्या, लहान मुलांचे कपडे, शैक्षणिक साहित्य, मेडिकल साहित्य (गोळ्या, कफ सिरप, सॅनिटरी पॅड), पाणी बॉटल, ब्लॅंकेट, चादरी व भांडी अशा अत्यावश्यक वस्तूंचा समावेश होता. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून व तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या हस्ते गाड्यांचे पूजन करून ही मदत रवाना करण्यात आली.

ही मदत परांडा (जि. धाराशिव) व घनसावंगी (जि. जालना) या तालुक्यांतील पूरग्रस्त भागांमध्ये पोहोचविण्यात येणार आहे. याप्रसंगी मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीने माऊली दादा सावंत, विक्रमसिंह शितोळे, किरण भोसले, नरेश सस्ते, रामभाऊ सपकाळ, अक्षय तावरे आदी कार्यकर्त्यांची निरीक्षक टीम गाड्यांसह रवाना झाली.
