आत्मविश्वास, सहकार आणि समाजसेवेचा संगम — दिलीपसिंह भोसले

– संदीप जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी, सद्गुरु महाराजा उद्योग समूह, फलटण.

। लोकजागर । दि. 14 ऑक्टोबर 2025 ।

फलटण तालुक्यातील सहकार क्षेत्राला वेगळे आणि निर्णायक वळण देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. दिलीपसिंह भोसले उर्फ भैय्यासाहेब. आर्थिक प्रगतीसोबत सामाजिक जाण व सहकार्याची वृत्ती जपत त्यांनी समाजजीवनात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. दि. १४ ऑक्टोबर रोजी त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे.

ज्याच्या स्पर्शाने लोखंड सोनं होतं तो परीस, आणि ज्याच्या वाणीत अमृत असतं तो समाजाचा प्रेरणास्रोत ठरतो. भैय्यासाहेबांचा प्रवास हाच या दोन्ही प्रतीकांचा सजीव मिलाफ आहे. कोणताही वारसा नसताना, केवळ आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व सहकार क्षेत्रात यशाचे डोंगर उभे केले.

सहकारातील अग्रगण्य वाटचाल

सन १९८१ मध्ये हॉटेल गुलमोहर या व्यवसायातून त्यांनी उद्योजकतेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर १९८९ साली श्री सद्गुरु हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्था स्थापन केली. हीच संस्था आज वटवृक्ष बनून समाजाचा आर्थिक कणा ठरली आहे.

सहकार महर्षी स्व. हणमंतराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत, अल्पावधीतच त्यांनी १७ हून अधिक संस्था उभ्या केल्या. महाराजा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून सहकारात नवे पर्व सुरू झाले. या संस्थेला ‘नॅशनल अवॉर्ड २०१७’, ‘सहकार गौरव पुरस्कार’, ‘सह्याद्री अर्थरत्न पुरस्कार’ यांसारख्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय गौरवांनी सन्मानित करण्यात आले आहे.

शिक्षण, समाजसेवा आणि सांस्कृतिक योगदान

सद्गुरु शिक्षण संस्थेमार्फत ‘ब्रिलियंट अ‍ॅकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल’च्या माध्यमातून तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणाची दारे खुली केली. फलटण फेस्टीव्हल, नेत्रतपासणी शिबिरे, पूरग्रस्तांना मदत, चारा छावणी यांसारखे अनेक उपक्रम त्यांनी राबविले.

नगराध्यक्षपद भूषविताना त्यांनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनाचे काम मार्गी लावले, तर सहकार संस्थांद्वारे समाजप्रबोधन व रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय लिहिला.

कुटुंब हीच प्रेरणाशक्ती

सौ. अ‍ॅड. मधुबाला भोसले या त्यांच्या यशस्वी सहचारिणी असून त्यांना ‘स्कॉलर पॉलिटीशिअन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सुपुत्र तेजूदादा आणि रणजितसिंह हे वडिलांचा वारसा पुढे नेत आहेत, तर सौ. मृणालिनी आणि सौ. प्रियदर्शनी यांनी शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात मोलाचे योगदान दिले आहे.

भैय्यासाहेबांचा जीवनप्रवास म्हणजे – कष्ट, आत्मविश्वास आणि समाजासाठीची निष्ठा यांचं प्रेरणादायी उदाहरण.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त —
“सहकार क्षेत्रातील परीसस्पर्शी व्यक्तिमत्वास हार्दिक शुभेच्छा!”


Spread the love