लोकजागर | फलटण | दि. 26 ऑक्टोबर 2025
माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पुढाकारातून फलटण शहर व तालुक्यात मंजूर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आणि कृतज्ञता मेळावा आज राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत फलटण येथे पार पडत आहे.

यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या भव्य सभामंडपात होणाऱ्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील असतील. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

या मेळाव्यात फलटण तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण होणार आहे. त्यात निरा-देवघर पाणी योजनेच्या कालव्याच्या दुसऱ्या टप्प्याचे कार्यारंभ, धोम बलकवडी आणि निरा देवघर जोड कालव्याचे लोकार्पण, गावडेवाडी–शेखमेरवाडी–वाघोशी उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन, तसेच फलटण शहर, फलटण ग्रामीण आणि वाठार पोलीस स्टेशनसह पोलीस वसाहतींचे उद्घाटन समाविष्ट आहे.

तसेच फलटण शहरातील पालखी महामार्गाचा कार्यारंभ, आसू–वारुगड रस्ता लोकार्पण, फलटण–दहिवडी व फलटण–आदर्की रस्त्यांचे भूमिपूजन, महसूल भवन आणि प्रशासकीय भवनांचे भूमिपूजनही या सोहळ्यात करण्यात येणार आहे.
दरम्यान, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे फलटणसाठी अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्यात —
- शहरातील खड्डेमुक्त रस्त्यांसाठी निधी,
- पाडेगाव–मुरुम–साखरवाडी–कोळकी–शिंगणापूर या नवीन रस्त्याच्या मंजुरीची घोषणा,
- बाणगंगा नदी कायम प्रवाही ठेवण्यासाठी ‘अमृत-2’ योजनेतील कामाला गती,
- एकत्रित न्यायालय इमारतीसाठी निधी,
- निरा देवघर प्रकल्पातील लिफ्टसाठी निधी,
- फलटण विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा,
- अप्पर जिल्हाधिकारी व साखरवाडी तहसिल पदनिर्मिती,
- नाईकबोमवाडी एमआयडीसीमध्ये ‘लार्ज मेगा प्रोजेक्ट’ची मागणी,
- पुणे–पंढरपूर रोडसाठी नवीन बाह्यवळण मार्ग,
- आणि झिरपवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या पुनरुज्जीवनाची मागणी यांचा समावेश आहे.
या सर्व मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांकडून कोणत्या घोषणा होतात, याकडे संपूर्ण फलटण तालुक्याचे लक्ष लागले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यात ‘बंपर गिफ्ट’ची अपेक्षा वाढली असून, संपूर्ण फलटणवासीयांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

