। लोकजागर । फलटण । रोहित वाकडे । दि. 27 ऑक्टोबर 2025 ।
मोठे नेते येतात, गर्दी जमते, कौतुकाची स्तुतीसुमने आणि टिकांचे बाण उडवले जातात; पण या सगळ्यातून जनतेच्या जीवनात ठोस, दीर्घकालीन बदल घडतो का, हा महत्त्वाचा प्रश्न असतो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फलटण दौर्यात झालेल्या भव्य सभेनंतर मात्र फलटणवासीयांमध्ये आशेची नवी किरण दिसत आहे.
या दौऱ्यात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे भूमीपूजन, शुभारंभ आणि लोकार्पण झाले. कार्यक्रमाचे मुख्य आयोजक माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी अचूक टायमिंग साधत फलटणच्या विकासासाठी विविध मागण्या मांडल्या. आरोग्य, उद्योग, वाहतूक आणि पर्यावरण या सर्व क्षेत्रांचा विचार करून करण्यात आलेल्या या मागण्यांना फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
१. फलटण एमआयडीसीत मेगा प्रोजेक्टची आशा
फलटणच्या नाईकबोमवाडी एमआयडीसी परिसरात मोठा औद्योगिक मेगा प्रोजेक्ट आणण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले. “मी स्वतः प्रयत्नशील असून येथे नक्कीच मोठी गुंतवणूक आणणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास स्थानिक रोजगारनिर्मितीला मोठा हातभार लागेल आणि बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल.
२. सुसज्ज शासकीय रुग्णालयाचा निर्णय लवकरच
औद्योगिक दृष्ट्या वाढणाऱ्या फलटणमध्ये आरोग्यसेवा सुधारण्यासाठी शासकीय रुग्णालय सुसज्ज करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले. यामुळे आधुनिक वैद्यकीय उपकरणे, अधिक डॉक्टर पदे आणि सेवा विस्तार शक्य होऊन नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळेल.
३. फलटण विमानतळ विकासाची दिशा
“फलटण औद्योगिकदृष्ट्या प्रगत करायचा असेल तर विमानतळ आवश्यक आहे,” असे सांगून फडणवीस यांनी विमानतळाच्या सर्वेक्षणासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली. समितीचा अहवाल सकारात्मक आल्यास लघुविमानांसाठी फलटण विमानतळ विकसित करण्यात येईल. या पावलामुळे गुंतवणूक, पर्यटन आणि रोजगार क्षेत्राला गती मिळेल.
४. बाणगंगा नदीचा ‘अमृत-२’ योजनेत समावेश
फलटण शहराच्या जलसंपदा आणि पर्यावरणाच्या दृष्टीने बाणगंगा नदीचा ‘अमृत-२’ योजनेत समावेश करण्यात येईल. याअंतर्गत नदी शुद्धीकरण, सांडपाणी प्रक्रिया व साठवण प्रकल्प उभारले जाणार असून, शहराला स्वच्छ आणि स्थिर जलस्रोत मिळणार आहे.
५. पाडेगाव-मुरुम-साखरवाडी-जिंती-फलटण-कोळकी-शिंगणापूर रस्ता प्रकल्पाला गती
माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या मागणीचा संदर्भ देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या महत्त्वाच्या रस्त्याच्या विकासाची घोषणा केली. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत हा रस्ता उभारला जाणार असून, ग्रामीण भागांना प्रमुख बाजारपेठांशी थेट जोडणारा हा दुवा ठरणार आहे.
या सर्व घोषणांमुळे फलटण तालुक्याच्या औद्योगिक, आरोग्य, रोजगार आणि वाहतूक क्षेत्राला नवा वेग मिळेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.
