। लोकजागर । फलटण । दि. 29 ऑक्टोबर 2025 ।
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवे वळण आले आहे. हॉटेल मधुदीप चे प्रमुख दिलीपसिंह भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेत सविस्तर खुलासा करत कागदोपत्री पुरावे सादर केले. या वेळी तेजसिंह भोसले व रणजितसिंह भोसले उपस्थित होते.
भोसले यांनी सांगितले की, “दि. 23 ऑक्टोबर रोजी रात्री 1:30 वाजता सदर महिला दुचाकीवरून हॉटेलच्या गेटवर आली. बारामतीला जायचे आहे असे सांगून रुमची मागणी केली. वॉचमनने तिला आत घेतल्यानंतर ती रिसेप्शनला गेली, स्वतःच्या हाताने रजिस्टरमध्ये नाव लिहिले व आधारकार्ड दिले. त्यानंतर तिने रुमची चावी घेऊन स्वतःच रुम उघडून आत गेली.”
ते पुढे म्हणाले, “महिला रात्री उशिरा आल्यामुळे सकाळी हॉटेलकडून चहा-पाणी वगैरेसाठी दार वाजवले गेले नाही. मात्र दुपारी 12 नंतर काही प्रतिसाद न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी संपर्क साधला. सायंकाळी पोलिसांना कळवून 6:30 च्या सुमारास दार उघडण्यात आले तेव्हा ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. त्यानंतरचा संपूर्ण तपास पोलिसांनी हाती घेतला.”
भोसले यांनी स्पष्ट केले की, “घटनेचा संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज पोलीस प्रशासनाला दिला आहे. त्या फुटेजनुसार महिला रुममध्ये गेल्यानंतर इतर कुणीही व्यक्ती आत गेलेली नाही. गेल्या 32 वर्षांच्या हॉटेल इतिहासात असा प्रसंग कधीच घडलेला नाही. सज्ञान व्यक्तीला रुम देणे हे हॉटेलचे कायदेशीर कर्तव्य आहे.”
शिवसेनेच्या सुषमा अंधारे व जयश्री आगवणे यांनी हॉटेलवर केलेल्या विधानांबाबत भोसले यांनी खेद व्यक्त करत स्पष्ट केले की, “आमच्यावर झालेले आरोप निराधार आहेत. आम्ही सर्व आवश्यक पुरावे पोलिसांना दिले असून तपासात सत्य निश्चितपणे स्पष्ट होईल.”
