। लोकजागर । फलटण । दि. 30 ऑक्टोबर 2025 ।
“वय वाढलं तरी तुम्हाला किती बुद्धी आहे हे साखरवाडीला माहिती आहे. साखरेचं एक पोत त्यांनी चार व्यापार्यांना विकली. मला तोंड उघडायला लावू नका. कारखाना हा भोगायला नसतो; तो शेतकर्यांचे संसार फुलवायला असतो. कारखाना आपल्याला चालवायला जमला नाही; हे एकदा तरी मान्य करा. खुर्चीत बसून नाही तर सुरवडीत बसून तुम्हाला लोळवीन, माझ्या नादाला तुम्ही लागू नका. येत्या दोन दिवसात अब्रुनुकसानीप्रकरणी मी तुम्हाला 100 कोटीची नोटीस देणार”; असा खरमरीत इशारा महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला.
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणानंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर विविध आरोप होत आहेत. यामागे आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असल्याचा आरोप ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे – पाटील यांनी केला होता. त्या आरोपाचा समाचार घेताना साखरवाडी येथील एका जाहीर कार्यक्रमात आ. श्रीमंत रामराजे बोलत होते.
‘‘महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे 1200 वर्षांच्या फलटणच्या इतिहासाला काळिमा फासला गेला आहे. हा कलंक पुसून कसा काढायचा? हा आपल्यापुढे प्रश्न आहे. मी कुणालाही अटक करा असं म्हणलेलो नाही; पण ज्यांची मनं खातायत; त्यांना माहितीय याचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत. आज – काल कुणीही अब्रु नुकसानीची नोटीस द्यायला लागलं आहे. ज्यांना अब्रु नाही त्यांची बेअब्रु कशी झाली हा संशोधनाचा विषय आहे’’, अशी टिकाही आ. श्रीमंत रामराजे यांनी यावेळी केली.
‘‘शरद पवारांनी मला सांगितलं होतं; यांच्या भानगडीत पडू नका. पण आपल्या तालुक्यातला माणूस आहे, बागायतदार यात अडकलेत म्हणून मी साखरवाडी कारखाना अडचणीतून बाहेर काढला. 200 कोटीचा कारखाना मी 69 कोटीला दिला असा माझ्यावर आरोप करतात मग ज्यांच्या घरात तुम्ही पाणी भरत आहात; त्या कारखानदारांना तुम्ही हा कारखाना घ्यायला सांगायचं होतं’’, अशी टिकाही आ. श्रीमंत रामराजे यांनी केली.
‘‘डॉ. संपदा मुंडे यांच्या प्रकरणामुळे नाईक निंबाळकर ब्रँडचे नाव कमी झाले आहे. हे पुसून टाकण्यासाठी डॉ. संपदा मुंडे यांचा हुतात्मा दिन आपल्याला साजरा करावा लागेल. फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात त्यांचा पुतळा उभा करण्याची मागणीही आपण सरकारकडे करणार आहे. यातून सगळे नाईक निंबाळकर सारखे नाहीत असा संदेश बाहेर जाईल’’, अशा भावनाही आ. श्रीमंत रामराजे यांनी यावेळी व्यक्त केल्या.
साखरवाडीतील एक आत्महत्या टळली : श्रीमंत संजीवराजे
‘‘फलटणमध्ये डॉ.संपदा मुंडे यांची घडलेली आत्महत्या दुर्दैवी आहे. साखरवाडीचा कारखाना श्रीमंत रामराजेंनी वाचवला त्यामुळे साखरवाडीतील एक आत्महत्या निश्चितपणे टळली’’, अशी बोचरी टिका यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केली.
