| लोकजागर | फलटण | दि. २ नोव्हेंबर २०२५ |
दैनिक सकाळचे पत्रकार संजय जामदार यांनी गिरनार परिक्रमा आणि नर्मदा परिक्रमेच्या उद्देशाने अध्यात्मिक सायकल यात्रेला प्रारंभ केला आहे. त्यांनी मालोजीनगर येथील श्री मारुती मंदिरापासून सायकलवरून यात्रेची सुरुवात केली.
ही पूर्णपणे सायकल यात्रा असून त्यांचा मार्ग फलटण – जेजुरी – बेलसर – उरुळीकांचन – आळंदी – चाकण – नारायणगाव – मंचर – नाशिक – सापुतारा – सुरत असा राहणार आहे. तिथून ते गिरनार पर्वतावर पोहोचून सुमारे ४५ किलोमीटरची चालत परिक्रमा करून श्री दत्त महाराजांचे दर्शन घेतील. त्यानंतर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक सोरठी सोमनाथ आणि पुढे द्वारका दर्शन घेऊन सायकलवरूनच श्रीक्षेत्र ओंकारेश्वर येथे पोहोचतील व नर्मदा परिक्रमेचा शुभारंभ करतील.
संपूर्ण यात्रेचे अंतर सुमारे ६,००० ते ६,५०० किलोमीटर असून जामदार हे ही यात्रा “घरापासून घरापर्यंत” सायकलवरूनच पूर्ण करणार आहेत.
पूर्वी त्यांनीही अनेक अध्यात्मिक यात्रांचा अनुभव घेतला आहे —
- २०११ मध्ये बसने नर्मदा परिक्रमा
- २०१४ मध्ये चालत नर्मदा परिक्रमा
- २०२१ मध्ये सायकलवरून घरापासून घरापर्यंत नर्मदा परिक्रमा
- २०२२ मध्ये पंढरपूर ते पंजाब (अमृतसर, घुमान) सायकल यात्रा
तसेच जानेवारी २०२५ मध्ये त्यांनी महाकुंभ प्रयागराज यात्राही सायकलवरून पूर्ण केली होती. त्या प्रवासात त्यांनी पंढरपूर, तुळजापूर, सोलापूर, लातूर, नांदेड, माहूरगड, नागपूर, जबलपूर, काशी, अयोध्या, बागेश्वर धाम, उज्जैन, ओंकारेश्वर, शेगाव, हिंगोली, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, अंबेजोगाई, करमाळा, राशीन आदी अनेक तीर्थक्षेत्रांची दर्शने घेतली होती.
सध्याची गिरनार परिक्रमा कार्तिक एकादशी ते कार्तिक पौर्णिमा या काळात केली जाते. ही परिक्रमा वर्षातून केवळ एकदाच करण्याची परंपरा आहे.
संजय जामदार यांची ही अध्यात्मिक सायकल यात्रा केवळ श्रद्धेचे प्रतीक नसून ‘सेल्फ मोटिव्हेशन’ आणि ‘स्वदेश दर्शन’ यांचा सुंदर संगम आहे.
