। लोकजागर । फलटण । दि. 7 नोव्हेंबर 2025 ।
फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजे गटाच्या प्रभागनिहाय मुलाखतींना जोरदार प्रतिसाद मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 8 मधून (नागरिकांचा मागास प्रवर्ग) विशाल तेली यांच्या उमेदवारीसाठी नागरिक मोठ्या संख्येने एकवटले. या मुलाखतीदरम्यान प्रभागातील सर्व स्तरातील नागरिक – व्यावसायिक, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक – उत्साहात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे यामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला.
या मुलाखतीदरम्यान विशाल तेली यांनी नम्रपणे आपल्या उमेदवारीची भूमिका मांडली. आपल्या कार्यातून आणि सामाजिक बांधिलकीतून आपण प्रभागाचे प्रतिनिधित्व करण्यास सक्षम असल्याचे त्यांनी आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह राजे गटाच्या नेतृत्त्वासमोर स्पष्ट केले. त्यांच्या समर्थकांनीही, विशाल तेली हे फक्त नावापुरते समाजसेवक नाहीत, तर कामातून दिसणारे कार्यकर्ते आहेत, असे सांगत त्यांच्यावरील विश्वास व्यक्त केला.
सुमारे 50 वर्षांची प्रतिक्षा संपणार कां?
बैठकीत उपस्थित नागरिकांनी गेल्या सुमारे 50 वर्षांत तेली समाजातील कुणालाही फलटण नगरपरिषदेत प्रतिनिधित्वाची संधी मिळाली नाही याकडे लक्ष वेधले.आता समाजातील कार्यकर्त्यांनाही नेतृत्व करण्याची संधी मिळावी. त्यासाठी या प्रभागातून तेली समाजाचा उमेदवार उभा राहावा, आणि त्याला राजे गटाने मान्यता द्यावी अशी मागणी सर्वांनीच एकवटून केली.
सामाजिक कार्यात अग्रेसर, युवकांमध्ये लोकप्रिय
विशाल तेली हे तेली समाजाचे अध्यक्ष असून, शहरात त्यांचा विस्तृत जनसंपर्क आहे.ते सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असून, त्यांनी अनेक जनहिताच्या कामात पुढाकार घेतला आहे.युवक वर्गात त्यांची खास लोकप्रियता आहे. त्यांच्या आयोजन कौशल्यामुळे आणि तळागाळातील संपर्कामुळे ते युवा नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
राजे गटात उमेदवारीवर उत्सुकता
राजे गटाच्या मुलाखतीनंतर प्रभाग क्रमांक 8 मध्ये उमेदवारीसंदर्भात उत्सुकता वाढली आहे. विशाल तेलींचं नाव सर्वत्र चर्चेत असून, कार्यकर्त्यांमध्येही त्यांच्या नेतृत्वाबद्दल सकारात्मक वातावरण आहे. राजे गटाने जर त्यांना उमेदवारी दिली, तर प्रभागासाठी एक सक्षम पर्याय उपलब्ध होईल. विजय खेचून आणण्याची त्यांच्यात क्षमता आहे, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.
