नगराध्यक्षपदाची लढत गुलदस्त्यात

। लोकजागर । फलटण । दि. 9 नोव्हेंबर 2025 ।

बहुप्रतिक्षीत फलटण नगरपरिषदेच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून दिनांक 10 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. निकालाअंती 13 प्रभागांमधून 27 नगरसेवक पालिकेचे प्रतिनिधीत्व करणार असून नगराध्यक्ष लोकनियुक्त असल्याने शिवाय ते सर्वसाधारण खुले असल्याने या पदासाठी रंगतदार लढत होणार आहे. मात्र या पदासाठी राजे गट व खासदार गटाकडून कोण उमेदवार असणार हे अद्याप गुलदस्त्यात असल्याने उमेदवारीच्या अधिकृत घोषणेकडे फलटणकरांचे लक्ष लागले आहे.

नगराध्यक्षपद खुले जाहीर झाल्यापासून राजे गटाकडून माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीची मागणी कार्यकर्त्यांमधून होताना पहायला मिळाले आहे. मात्र त्यांच्या नावासह माजी नगराध्यक्ष श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्याही उमेदवारीची शक्यता व्यक्त होताना दिसत आहे.

दुसरीकडे खासदार गटामधून नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीची शक्यता वर्तवली जात असतानाच माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनीही खासदार गटाकडे उमेदवारीची मागणी केली आहे.

शहरात अद्याप राजे गट व खासदार गट यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही गटाकडून पालिका निवडणूकीबाबत सुतोवाच केले नसले तरीही नगराध्यक्षपदाची लढत दुरंगी होणार की तिरंगी? याबाबत शहरात उलट – सुलट चर्चांना उधाण आले आहे.

आ.श्रीमंत रामराजेंची फिरकी….

नुकत्याच काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत विधानपरिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्याला स्वत:ला नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे बोलून दाखवले आहे. आ. श्रीमंत रामराजे यांच्या या फिरकीमुळे विरोधकांच्या तयारीला ब्रेक लागून ते ‘वेट अँड वॉच’ च्या भूमिकेत तर गेले नाहीत नां? अशीही चर्चा शहरात होताना दिसत आहे.

Spread the love