| लोकजागर | फलटण | दि. १३ नोव्हेंबर २०२५ |
फलटण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आज चौथ्या दिवशी, म्हणजेच गुरुवार दि. 13 नोव्हेंबर रोजी सर्व प्रभागांमधून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.
नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपर्यंत सर्व 13 प्रभागांमध्ये एकूण अर्जसंख्या शून्यच आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत काही दिवस बाकी असली तरी इच्छुक उमेदवारांकडून अद्याप ठोस हालचाल दिसून आलेली नाही.
निवडणूक जाहीर होऊन चार दिवस उलटले तरी अर्ज दाखल न होणे हा विषय शहरात चर्चेचा ठरला आहे. “या वेळी अर्ज शेवटच्या क्षणीच पडणार बहुतेक!” असं म्हणत नागरिक राजकारणाची चर्चा रंगवताना दिसत आहेत.
