प्रभाग २ मध्ये सौ. वैशाली अहिवळे प्रबळ दावेदार

| लोकजागर | फलटण | दि. १४ नोव्हेंबर २०२५ |

फलटण नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ मधून माजी नगरसेविका सौ. वैशाली सुधीर अहिवळे यांना उमेदवारी देण्याची मागणी जोर धरत आहे. दोन पिढ्यांचा राजकीय वारसा, मजबूत जनसंपर्क आणि सामाजिक कार्याची भक्कम पार्श्वभूमी यामुळे भाजपाच्या उमेदवारीसाठी त्या सर्वाधिक प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.

सौ. अहिवळे यांच्या कुटुंबाचा फलटणच्या राजकारणात दीर्घ काळापासून ठसा आहे. त्यांचे सासरे कालकथित तानाजीराव अहिवळे हे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष होते. तर त्यांच्या थोरल्या जाऊबाई श्रीमती स्वाती आशिष अहिवळे यांनी अपक्ष म्हणून राजे गटाविरोधात मोठा विजय मिळवत उपनगराध्यक्षा पद भूषवले होते. अशा घराणेशाहीपेक्षा, विश्वासार्ह कार्य आणि जनतेशी घट्ट नातं हेच त्यांची खरी ताकद असल्याचं मानलं जातं.

प्रभाग २ मध्ये “शिस्तबद्ध, जनतेत मिसळणाऱ्या आणि काम करणाऱ्या व्यक्तींना संधी द्यावी” अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत असून, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीत सौ. अहिवळे यांच्या उमेदवारीला अधिक चालना मिळाल्याची चर्चा आहे. स्थानिक राजकीय वातावरण पाहता, त्यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या विजयाची शक्यता अत्यंत मजबूत मानली जाते.
त्यांचे पती सुधीर अहिवळे हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. नागरिकांच्या अडचणी, महिला प्रश्न, सामाजिक उपक्रम आणि गरजूंसाठी मदत या क्षेत्रात त्यांनी सातत्यपूर्ण काम केल्याने अहिवळे कुटुंबाचा लोकसंपर्क अजून बळकट झाला आहे. त्याचा थेट फायदा सौ. वैशाली अहिवळेंच्या उमेदवारीला मिळणार असल्याचे जाणकार सांगतात.

महिला मतदारांमध्ये त्यांची लोकप्रियता विशेष असून, रस्ते, पाणी, आरोग्य, महिलांचे प्रश्न अशा स्थानिक मुद्द्यांवर त्यांनी सक्रिय भूमिका घेतली आहे. त्यामुळे प्रभाग २ मधील भाजपाच्या संभाव्य उमेदवारांमध्ये सध्या वैशाली अहिवळे यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे.

त्यांचे थोरले दिर कालकथित आशिष अहिवळे यांनी केलेले सामाजिक काम आजही अनेकांना प्रेरणा देते. युवक संघटन, नागरिकांशी निगडित कार्यक्रम आणि संघटन कौशल्य यात त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती. आजही त्यांचे सहकारी अहिवळे कुटुंबाच्या पाठीशी एकदिलाने उभे आहेत.

प्रभाग २ मध्ये स्पर्धा चुरशीची होणार हे निश्चित असले, तरी राजकीय पार्श्वभूमी, संघटन क्षमता आणि मजबूत जनाधार यामुळे सौ. वैशाली अहिवळे यांचा विजय निश्चित मानला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

Spread the love