| लोकजागर | फलटण | दि. १४ नोव्हेंबर २०२५ |
फलटण नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीची चाहूल लागताच प्रभाग क्रमांक 8 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या (खासदार गट) संभाव्य उमेदवार सिद्धाली अनुप शहा यांनी आपल्या प्रचाराला जोमदार सुरुवात केली आहे. प्रभाग क्रमांक 8 परिसरात त्यांनी घरोघरी जाऊन जनसंपर्काचा धडाका लावला असून, विशेषतः महिलांकडून आणि जेष्ठ नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सिद्धाली शहा यांनी मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा जाणून घेतल्या. जेष्ठ नागरिकांनी त्यांना मनापासून आशीर्वाद दिले, तर लहानग्यांसोबत त्यांनी गप्पा मारत त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केला. हा संवाद पाहताच परिसरात एक विशेष उत्साही वातावरण निर्माण झाले.
या दौऱ्यात मोठ्या संख्येने महिला त्यांच्या सोबत सहभागी झाल्या होत्या. काही ठिकाणी महिलांनी त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागतही केले. सिद्धाली शहा यांनी महिलांच्या समस्या लक्षपूर्वक ऐकून त्या सोडवण्याची ग्वाही दिली. महिलांचा हा मोठा सहभाग त्यांच्या उमेदवारीसाठी एक महत्त्वाचा आधार ठरत आहे.
मतदारांना संबोधित करताना सिद्धाली अनुप शहा म्हणाल्या की, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि जि. प. सदस्या अॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अनुप शहा यांच्या अनुभवाच्या आधारे प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी आमची दिशा स्पष्ट आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे आणि प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या अडचणीला तातडीने प्रतिसाद देणे ही आमची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “एका हाकेला धावून येणारी सेवा” देण्याचे आश्वासनही त्यांनी मतदारांना दिले.
पायाभूत सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता आणि मूलभूत गरजांवर आधारित विकासाचा रोडमॅप त्यांनी नागरिकांसमोर मांडला असता, प्रभाग क्रमांक 8 परिसरातील लोकांनी त्याचे स्वागत केले.
दरम्यान, प्रभाग क्रमांक 8 मधील भाजपच्या वाढत्या प्रचारगतीमुळे स्थानिक राजकीय वातावरणही रंगू लागले आहे. सिद्धाली शहा यांचा लोकांशी थेट संवाद आणि विकासाच्या ठोस आश्वासनांमुळे त्यांच्या बाजूने सकारात्मक चर्चा सुरू झाल्या आहेत.
