। लोकजागर । फलटण । दि. 14 नोव्हेंबर 2025 ।
आम्ही पाणी, कारखाने आणले आहेत. तुम्हाला 30 वर्षे दिलेलं पुढे 300 वर्ष टिकलं पाहिजे. आमच्याकडून एखादं काम होणार नाही पण कुणाचं वाटोळ आम्ही करणार नाही. जीवात जीव असेपर्यंत आम्ही तुमचं भलचं बघणार आहे. आता उत्तराला उत्तर देण्याची वेळ आली आहे. फलटण तालुक्यातलं दहशतीचं राज्य संपवूनच मी दाखवेन’’, असा इशारा महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला.
बिबी, ता. फलटण येथील जाहीर कार्यक्रमात आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार दीपक चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय अनपट यांच्यासह आजी – माजी पदाधिकारी उपस्थित होते.
आम्ही गावागावात कधी भांडण लावली नाहीत; गटबाजी वाढून दिली नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा धूसवास आम्ही कधी केला नाही. आज गावागावात प्रशासकीय दहशत काही लोक करत आहेत, त्याचा मास्टरमाईंड कोण आहे आहे?, असा सवालही आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी उपस्थित केला.
धोम – बलकवडी, निरा – देवधरशी विरोधकांचा काहीही संबंध नाही. एखाद्या पाईपलाईनची प्रशासकीय मान्यता आणली म्हणजे ते पाणी किंवा धरण त्यांनी आणलं असं होत नाही. ‘जलनायक’ होणं एवढं सोपं नसतं. तालुक्यातील गोरगरीब समृद्ध झाला पाहिजे यासाठी गेल्या 25 वर्षात श्रीमंत रामराजेंनी काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचं श्रेय कोणीही घेता कामा नये, असे माजी आमदार दीपक चव्हाण यांनी सांगितले.
