प्रभाग 8 मध्ये सिद्धाली अनुप शहा मैदानात; उमेदवारी अर्ज दाखल

। लोकजागर । फलटण । दि. 16 नोव्हेंबर 2025 ।

फलटण नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक 8 मध्ये राजकीय वातावरण तापले असून, भारतीय जनता पार्टीच्या (खासदार गट) अधिकृत उमेदवार सौ. सिद्धाली अनुप शहा यांनी प्रांताधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात ही लढत लढवली जात आहे. तर फलटण शहरात गेल्या अनेक वर्षांत जनसंपर्क आणि विकासकामांमुळे ओळख निर्माण केलेले नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अनुप शहा यांच्या कार्याचा आधार सिद्धाली शहा यांना मिळत आहे.

अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना सिद्धाली शहा म्हणाल्या, ‘‘प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे. सरकारकडून मिळणारा निधी पारदर्शकपणे वापरून प्रभागाचा कायापालट करण्याचा प्रयत्न करू. मतदारांचा विश्‍वास कामातूनच सिद्ध करू.’’

दरम्यान, सिद्धाली शहा यांनी प्रचार मोहिमेला वेग दिला असून ब्राह्मण गल्ली, शंकर मार्केट, मारवाड पेठ, श्रीराम मंदिर परिसर, गजानन चौक आणि मुधोजी प्राथमिक शाळा परिसरात त्यांनी काढलेल्या पदयात्रांना नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे महिला मतदारांची उपस्थिती लक्षणीय दिसत आहे.

फक्त मतांचा जोगवा मागण्यापेक्षा प्रत्येक घराघरातून कुटुंबीयांची चौकशी, ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि लहान मुलांशी संवाद यामुळे प्रचारात ‘आपुलकीचा स्पर्श’ निर्माण झाला आहे.

प्रभागातील मूळ प्रश्‍न, सुविधा व विकासयोजनेबाबत सिद्धाली शहा जाणकार असून, उच्चशिक्षित आणि सर्वांशी मिसळणारी उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. भाजपच्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनासोबतच अनुप शहा यांच्या कामाचा वारसा असल्याने विरोधकांसाठी ही लढत अधिक आव्हानात्मक ठरणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

Spread the love