। लोकजागर । फलटण । दि. 17 नोव्हेंबर 2025 ।
फलटण नगरपरिषद निवडणुकीचं वातावरण दिवसेंदिवस रंगत चाललं आहे. त्यातच प्रभाग क्रमांक 8 मधून उभी राहिलेल्या कु. सिद्धाली अनुप शहा यांच्या प्रचाराला छान गती मिळत आहे. साधी, शांत आणि सर्वांना आपली वाटणारी कार्यशैली यामुळे सिद्धालींना लोकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय.
कु. सिद्धाली या फलटण शहरातील माजी नगरसेवक आणि सामाजिक कामात नाव कमावलेले अनूप शहा यांच्या कन्या. अनूप शहांचा नगरपालिकेतील मोठा अनुभव, शहरात असलेला संपर्क आणि सामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची परंपरा-या सगळ्या गोष्टी सिद्धालींच्या प्रचारात पायाभरणी करून जात असल्याचं चित्र आहे.
ब्राह्मण गल्ली असो, शंकर मार्केट असो की मारवाड पेठ-सिद्धाली शहा जेव्हा त्या भागात जात आहेत तेव्हा त्यांना महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. घरोघरी जाऊन कुटुंबांची विचारपूस करणं, समस्या शांतपणे ऐकून घेणं, आणि लोकांशी साधेपणाने बोलणं-यामुळे लोक त्यांना आपल्यातलीच मुलगी म्हणू लागले आहेत. अनेक महिला स्वतःहून पुढं सरसावून त्यांच्या प्रचारात सहभागी होत आहेत. ही तरुण, शिकलेली आणि स्वच्छ मनाची उमेदवार पुढं आली तर प्रभागाचं रुपं बदलेल असा सूर महिलांतून ऐकायला मिळतो.
लहान मुलांनाही त्या अगदी मायेने जवळ घेतात. चिमुकल्यांना छोट्यामोठ्या वस्तू देत, त्यांच्याशी हसतखेळत गप्पा मारताना दिसतात. यामुळे प्रचाराला कुटुंबासारखं वातावरण लाभत आहे.
आपल्या उमेदवारीबद्दल बोलताना सिद्धाली म्हणाल्या, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या सौ. जिजामाला नाईक निंबाळकर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. माझे वडील अनूप शहा यांनी या शहरासाठी जेवढं काम केलंय, ते पुढे न्यायचं आहे, हीच माझी ताकद आहे. आश्वासनं देऊन काही होत नाही. लोकांच्या अडचणी ऐकणं, त्या सोडवण्यासाठी लढणं आणि शासनाच्या योजना थेट लोकांपर्यंत पोहोचवणं हेच माझं खर्या अर्थानं ध्येय आहे.
