रणजितदादांच्या नेतृत्त्वात फलटणच्या विकासाला नवी दिशा देऊया : कु. सिद्धाली शहांची प्रभाग ८ मधील मतदारांना साद

। लोकजागर । फलटण । दि. 19 नोव्हेंबर 2025 ।

‘‘माझे वडील अनुप शहा यांचे कार्य केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नसून, ते व्यापक आणि शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचलेले आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली हे जनसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी आणि फलटणच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी मला आपली साथ आणि आशीर्वाद द्या’’, अशी आर्त विनंती कु. सिद्धाली शहा यांनी आपल्या गाठी – भेटीवेळी मतदारांना केली.

फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीचा ज्वर चांगलाच तापला असून उमेदवारांनी आपापल्या प्रभागात मतदारांच्या गाठी – भेटी सुरु केल्या आहेत. या निवडणुकीत प्रामुख्याने शिवसेना (धनुष्यबाण) चिन्हावर ’राजे गट’, भारतीय जनता पार्टी (कमळ) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (घड्याळ) चिन्हावर ’खासदार गट’ असे प्रमुख गट आमनेसामने आहेत. या चुरशीच्या लढाईत, खासदार गटाने प्रभाग क्रमांक 8 मध्ये कुमारी सिद्धाली अनुप शहा यांचा अत्यंत तरुण, लक्षवेधक चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. प्रभागातील तेली गल्ली, शनिवार वाडा, मारवाड पेठ, बारस्कर गल्ली या भागात जनसंपर्क करताना ठिकठिकाणी त्यांना महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

फलटण नगरपालिकेतील आजवरचे ’फायर ब्रँड’ आणि सर्वसामान्यांचे नेते म्हणून ओळखले जाणारे अनुप शहा यांच्या कन्या म्हणून सिद्धाली शहा यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरली आहे. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून त्या निवडणुकीला सामोर्‍या जात आहेत. विशेष म्हणजे, प्रभागातील प्रचार दौर्‍यांदरम्यान, कुमारी सिद्धाली शहा यांच्यामध्ये त्यांच्या वडिलांची, म्हणजे अनुप शहांची, सर्वसामान्य जनतेबद्दल असलेली तीच सहानुभूती आणि तळमळ स्पष्टपणे दिसून येत आहे. वडिलांनी गोरगरीब आणि शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचून केलेल्या व्यापक कार्याचा वारसा घेऊनच त्या मतदारांना सामोर्‍या जात आहेत.

फलटण नगरपालिकेच्या आखाड्यात आजवरच्या फायर ब्रँड नेत्याच्या कन्या म्हणून सिद्धाली शहा हा तरुण चेहरा खासदार गटासाठी निर्णायक ठरू शकतो. तरुणाईचा जोश आणि वडिलांच्या लोककार्याची पुण्याई घेऊन मैदानात उतरलेल्या या युवा उमेदवाराबद्दलची उत्सुकता फलटणकरांमध्ये शिगेला पोहोचली असून, प्रभाग क्रमांक 8 मधील लढत अत्यंत चुरशीची होणार यात शंका नाही.

Spread the love