। लोकजागर । फलटण । दि. २० नोव्हेंबर २०२५ ।
फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असताना, प्रभाग क्रमांक ८ मध्ये भारतीय जनता पार्टीने (खासदार गट) राजकारणाचा एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवार कु. सिद्धाली अनुप शहा यांनी उमेदवारी जाहीर होताच, तिकीट मिळवण्यासाठी उत्सुक असलेल्या पक्षातील इतर ज्येष्ठ व तरुण नेत्यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. फलटण शहराच्या राजकीय इतिहासात पक्षांतर्गत लोकशाहीचा मान राखत, एकीचा संदेश देणारी सिद्धाली शहा या पहिल्याच उमेदवार ठरल्या आहेत.
प्रभाग क्रमांक ८ मधून भाजपचे तिकीट मिळावे यासाठी अनेक प्रमुख दावेदार होते. यामध्ये माजी नगराध्यक्ष सुदाम (अप्पा) मांढरे, माजी नगरसेवक अजय माळवे आणि युवा नेते राहुल शहा यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे प्रबळ दावेदारी केली होती. मात्र, पक्षाने शेवटी युवा आणि आश्वासक चेहरा असलेल्या सिद्धाली अनुप शहा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
राजकारणात उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी किंवा नाराजीनाट्य पाहायला मिळते, पण सिद्धाली शहा यांनी वेगळी भूमिका घेतली. उमेदवारी अर्ज अंतिम झाल्यावर त्यांनी अत्यंत समंजसपणा दाखवत, या सर्व ज्येष्ठ आणि तरुण इच्छुकांच्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांनी केवळ भेट घेतली नाही, तर त्यांचे आशीर्वाद घेऊन पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्याची विनंती केली. त्यांच्या या कृतीने भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले.
या भेटीदरम्यान, माजी नगराध्यक्ष सुदाम (अप्पा) मांढरे यांनी सिद्धाली शहांचे विशेष कौतुक केले. “पक्षश्रेष्ठींचा निर्णय आम्हाला शिरोधार्य आहे. प्रभागाच्या विकासासाठी आम्ही सर्वजण एक दिलाने तुझ्या पाठीशी उभे राहू,” असा मोठ्या मनाचा शब्द त्यांनी सिद्धाली शहांना दिला. या जेष्ठ नेत्यांकडून मिळालेल्या आशीर्वादामुळे सिद्धाली शहा यांच्या प्रचाराला मोठे बळ मिळाले आहे.
तसेच, माजी नगरसेवक अजय माळवे आणि युवा नेते राहुल शहा यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. “निवडणूक ही केवळ व्यक्तीची नसून विचारांची आहे. त्यामुळे गट-तट विसरून आम्ही भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करू,” असे आश्वासन या नेत्यांनी दिले. प्रभाग क्र. ८ मध्ये भाजप एकसंघ आणि मजबूत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत माजी विरोधी पक्षनेते अनुप शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. अनुप शहा यांनी आपल्या कारकिर्दीत सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची जी संस्कृती जपली, त्याचेच प्रतिबिंब या भेटीगाठीत दिसले. त्यांच्या उपस्थितीमुळे पक्ष कार्यकर्ते आणि इच्छुकांमध्ये विश्वासाचे नाते अधिक घट्ट झाले.
फलटण शहरात या सौहार्दपूर्ण भेटीगाठींची सध्या जोरदार चर्चा आहे. सहसा नाराजी दूर करण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कसरत करावी लागते. मात्र, सिद्धाली शहा यांनी स्वतः पुढाकार घेऊन ‘संवाद आणि सन्मान’ या मूल्यांचा आदर केला. हा नवीन आदर्श फलटणच्या राजकारणात निश्चितच कौतुकास्पद ठरला आहे. आता प्रभाग क्रमांक ८ मध्ये भाजप पूर्ण ताकदीने आणि एकजुटीने निवडणुकीला सामोरे जात आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील या एकीचा फायदा मतपेटीतून नक्कीच दिसेल, असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.
