फलटण पालिका निवडणुक : माघारीच्या दिवशी नेमके काय घडणार? कोण माघार घेणार, कोणाची लढत नक्की होणार ?

। लोकजागर । फलटण । दि. २१ नोव्हेंबर २०२५ ।

फलटण नगरपालिका निवडणुकीतील उमेदवारी अर्जांच्या माघारीचा आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे शहरात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. सुरुवातीला लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी ८ अर्ज आणि २७ नगरसेवक पदांसाठी तब्बल १८७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननी प्रक्रियेनंतर आता नगराध्यक्षपदाचे ४ अर्ज आणि नगरसेवक पदांचे १०७ अर्ज वैध ठरले आहेत, ज्यामुळे आजच्या माघारीच्या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सुरू झाल्यापासून काही इच्छुकांनी आपली माघार घेतली आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रभाग क्रमांक ९ (ब) मधून निखील विद्याधर भोईटे, प्रभाग क्रमांक ४ (अ) मधून प्रभा चंद्रशेखर हेंद्रे आणि प्रभाग क्रमांक १० (ब) मधून अजय अरुण भोईटे यांनी आपले नामांकन मागे घेतले आहे. मात्र, वैध उमेदवारांची संख्या पाहता, अजूनही अनेक प्रभागांमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात आहेत.

आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने, आता खरा राजकीय कस लागणार आहे. प्रमुख राजकीय पक्षांचे नेते आणि गट आपापल्या उमेदवारांसाठी आणि प्रतिस्पर्धकांना नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी मनधरणीचे प्रयत्न करणार आहेत. कोणता गट आपली निवडणूक सोपी करण्यासाठी काय प्रयोग करतो, कोणाची उमेदवारी अर्ज माघारी निघून कोणती लढत ‘नक्की’ होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

एकंदरीत, फलटण पालिका निवडणुकीतील अनेक प्रभागांचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. नगराध्यक्षपदाच्या प्रमुख लढतीवर परिणाम करणारे काही निर्णय होतात का, याकडेही लक्ष आहे. आजच्या माघारीनंतरच फलटणकर नागरिकांना निवडणुकीतील खरी आणि थेट लढत कोणामध्ये आहे, हे कळणार आहे. आजचा दिवस शहरातील राजकीय ‘फाइनल डे’ ठरणार आहे.

Spread the love