। लोकजागर । सातारा । दि. 10 डिसेंबर 2025 ।
मनुवादी, ब्राह्मो-भांडवली शोषकांच्या गढीला आणि त्यांच्या अमानुष तत्वज्ञानाला न्याय, निडरता आणि संविधानिक भूमिकेने सुरुंग लावणारे नाव म्हणजे डॉ. बाबा आढाव,” अशा शब्दांत विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य प्रवक्ते विजय मांडके यांनी श्रद्धांजली वाहिली. आपल्या विचारांत आणि कृतीत तडजोड न करण्याचा आदर्श उभा करणारे, जातीअंताच्या लढ्यात एकमेवाद्वितीय सत्यशोधक नेते म्हणून त्यांनी बाबांचे स्मरण केले. महिला, कष्टकरी, दलित, आदिवासी, हमाल अशा वंचित वर्गाचा तारणहार गेला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. “विषमता निर्मूलन शिबिरे पुन्हा सुरू करणे आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीला एकजूट करणे हीच खरी आदरांजली ठरेल,” असे ते म्हणाले.
मांडके यांनी भावनिक शब्दांत लिहिले की, “बाबांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात सत्याग्रह केला, म्हणून ‘येरवडा विद्यापीठाचा पदवीधर’ होण्याची संधी मला मिळाली.” बाबांच्या नेतृत्वाखाली अनेक लढ्यांचा, आंदोलनांचा अनुभव मिळाल्याचा उल्लेख त्यांनी केला. धरणग्रस्तांचा लाँग मार्च असो वा नामांतर लढा, विषमता निर्मूलन शिबिरे असोत वा समता प्रतिष्ठानचे कार्यक्रम—प्रत्येक प्रवासात बाबांची विचारशक्ती आणि उपस्थिती जाणवत होती, असे मांडके म्हणाले.
सातारच्या गांधी मैदानावर कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनी अस्पृश्यतेचे समर्थन केल्याच्या निषेधार्थ झालेल्या सभेतील बाबांची ठाम भूमिका त्यांनी आवर्जून स्मरली — “अंडी फेकली असली तरी तुमची अंडी पिल्ली काढल्याशिवाय आम्ही थांबणार नाही,” हा त्यांचा निडर स्वर आजही कानात घुमत असल्याचे विजय मांडके लिहितात.
साताऱ्यात झालेल्या चौथ्या विद्रोही साहित्य-संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दिलेला संदेश, जातीअंताची चळवळ अधिक तीव्र करण्याचा आणि विद्रोही विचारधारा एकजूट ठेवण्याचा, याच दिशेचा होता. “बाबांबद्दल काय लिहू आणि काय बोलू? आठवणीचे मोठे गाठोडे माझ्याकडे आहे,” या शब्दांत मांडके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
